लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बोगस मॅट्रीमोनी साईटवरून युवतीशी संपर्क साधून नंतर तिला विश्वासात घेत लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ८.५० लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
विवाहाची बोलणी करण्यासाठी आपण गोव्यात येत आहे. मात्र विमानतळावर कस्टम विभागाने आपल्याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुटका करून घेण्यासाठी ८.५० लाख रुपये भरावे लागतील, असे या भामट्याने त्या पीडित युवतीला सांगितले. तिनेही त्याच्यावर विश्वास ठेवून हे पैसे जमा केले. मात्र त्यानंतर आपण फसल्याचे समजताच तिने सायबर पोलिस कक्षाकडे धाव घेतली.
फसवणुकीची घटना ही डिसेंबर महिन्यात घडली आहे. या पीडित युवतीने सोशल मीडियावरील एका मेट्रीमोनी साईटवर नाव नोंद केले होते. त्यानंतर तिला काही मुलांचे फोटो पाठवण्यात आले. यापैकी एका मुलाचा प्रोफाईल तिला पसंत पडला व त्याच्याच व्हॉट्सअॅपवरून बोलणे सुरू झाले. आपण विदेशात राहत असल्याचे या मुलाने सांगून तिला लग्नाची मागणी केली.
लग्नाची बोलणी करण्यासाठी आपण गोव्यात येत असून येताना दागिने आणू, असे तिला सांगितले. काही दिवसांनी त्याने आपल्याला विमानतळावर कस्टम विभागाने पकडले असून त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पैसे भरावे लागतील, असे फोनवरून पीडित युवतीला सांगितले.
तिने खटाटोप करून पैसे गोळा करून त्याच्या खात्यावर जमा केले. त्यानंतर त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने तिला आपण फसवलो गेल्याचे लक्षात आले व तिने तक्रार केली.
दागिने गहाण ठेवून पैशांची जुळवणी
संबंधित युवतीने तिच्याकडील असलेले सर्व पैसे ऑनलाइनद्वारे त्याला पाठवले. तसेच पैसे कमी पडत असल्याचे समजताच घरच्यांचा विरोध पत्करून दागिनेही गहाण ठेवून रक्कम उभी केली, मात्र ८.५० लाख रुपये जमा केल्यानंतर या मुलाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे कळताच आपण फसवलो गेल्याचे तिला समजले. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार सादर केली आहे.