लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: सरकारी नोकऱ्या विक्रीचे प्रकरण गाजत असताना एका वेगळ्या प्रकरणात प्रिया यादव नामक महिलेने रेल्वेत नोकरीच्या आमिषाने कोट्यवधीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात शुक्रवारी आणखी एका महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. प्रिया हिने मालमत्ता खरेदी, रेल्वे स्टॉल खरेदी व इतर अनेक कारणांनी आपल्यासह आपल्या तीन बहिणींचे लाखोंचे सोने आणि रोख रक्कम मिळून ७९.२३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद तिने डिचोली पोलिस ठाण्यात दिली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, प्रिया हिने विविध आमिषे दाखवून आपल्याकडून ३५ लाख रुपये उकळले. तसेच सोन्याच्या २ बांगड्या, ३ अंगठ्या आणि एक ब्रेसलेटही तिने मागून घेतले. या प्रकरणात आपल्या तिघा बहिणींचीही फसवणूक केल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. यापैकी एका बहिणीकडून ३६ लाख रुपये रोख आणि एक ११६.६३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, दुसऱ्या बहिणीकडून ४.५ लाख रुपये आणि तिसऱ्या बहिणीकडून ३.७३ लाख रुपये उकळले.
३५ लाख पहिली बहीण दागिने : सोन्याच्या २ बांगड्या, ३ अंगठ्या व एक ब्रेसलेट ३६ लाख
दुसरी बहीण ११६.६३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट ४.५ लाख
तिसरी बहीण ३.७३ लाख चौथी बहीण
काय आहे प्रकरण
१६ ऑगस्ट रोजी अनिकेत दलवाई (बोर्डे-डिचोली) यांनी डिचोली पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तक्रारीत प्रिया यादव हिंने २०२३ मध्ये आपल्या कोल्हापूर येथील २ जागा रेल्वे रुळासाठी जाणार असल्याने आपल्याला पाच नोकऱ्या मिळणार असल्याचे सांगून तुम्हाला सर्व पाचही नोकऱ्या देऊ, असे सांगितले. प्रत्येक पोस्टसाठी दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार जुलै २३ मध्ये तिला दहा लाख रुपये दिले. तसेच कर्नाटक व पुणे येथील दोन जणांनी तिला पाच लाख रुपये दिले होते. अशाच प्रकारे वेगवेगळी कारणे सांगून तिने अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आल्यानंतर या सर्वांनी डिचोली पोलिस स्थानकात जमाव करून धडक दिली होती. पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन सदर महिलेला त्वरित अटक करून पैसे वसूल करण्याची मागणी केली होती.
ही सर्व रक्कम कधी त्यांच्यासाठी मालमत्ता विकत घेण्याच्या बहाण्याने तर कधी रेल्वे स्टॉल खरेदी करून देण्याच्या मिषाने तिने मागून घेतली होती. डिचोलीत राहणारी प्रिया ही मूळची कोल्हापूरची असून तिला गेल्या आठवड्यात फुलेवाडी-कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिस 3 कॉन्स्टेबल राहुल वेनजी याची चौकशी केल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. परंतु प्रिया यादव ही पसार होती.
दागिनेही केले जप्त
नोकरीच्या आमिषाने प्रियाने काही जणांकडून दागिने घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे दागिने गहाण ठेवून तिने कर्जही काढले आहे. अटकेनंतर तिच्याकडून ९ लाख रुपये किमतीचे ११६ ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच तिच्याकडे दोन कार व दोन दुचाकी असल्याचे तपासात समोर आले आहे.