ऑनलाइन लोकमतडिचोली (गोवा), दि. 23 - ज्यांची 80 टक्के लाकडे स्मशानात गेली ते लोक मराठी राजभाषा व्हावी म्हणून आंदोलन करीत बसलेले आहेत, अशी टीका कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य यांनी गुरुवारी केली. मराठी राजभाषा होण्यासाठी लढणा-यांना विष्णू वाघांसारखे आमदार पाठिंबा देतात, असा उल्लेख करून आचार्य यांनी वाघ यांचाही निषेध केला. आचार्य हे गोव्यातील कोकणी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी झटणारे कट्टर कोकणीवादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कोकणी भाषेसाठी आयुष्य वेचलेले शणै गोंयबाब यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्य़ात प्रमुख वक्ते या नात्याने ते येथे बोलत होते. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी सध्या जे आंदोलन चालू आहे, त्यात वयस्कांचाच अधिक भरणा असून त्याला उद्देशूनच आपण हे विधान केल्याचे आचार्य यांनी कार्यक्रमानंतर पुन्हा स्पष्ट केले. इंग्रजी शाळांचे अनुदान सरकारने रद्द करावे यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच करत असलेल्या आंदोलनास मात्र पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
80 टक्के लाकडे स्मशानात गेलेले लोक मराठीसाठी आंदोलन करतात- चेतन आचार्य
By admin | Published: June 23, 2016 8:44 PM