पणजी : राज्यातील पुलांच्या स्थिरतेविषयीचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील 80 छोटे पुल व साकव नादुरुस्त आहेत. ते नव्याने बांधणो तसेच काही पुल दुरुस्त करणो अशी कामे लवकरच सुरू केली जातील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.तिस-या मांडवी पुलाशी निगडीत सोहळ्यापूर्वी बोलताना ढवळीकर म्हणाले, की पोर्तुगीजकालीन 80 पुल नादुरुस्त आहेत, असे ऑडिटवेळी आढळून आले. यापैकी काही छोटे पुल नव्यानेच बांधावे लागतील तर काही दुरुस्त करावे लागतील. दक्षिण गोवा जिल्ह्यातील पुलांचा अभ्यास अजून झालेला नाही. तो होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. सावर्डेत एक छोटा पूल काही वर्षापूर्वी कोसळून बरेच जण पाण्यात पडल्यानंतर राज्यातील सर्वच पोर्तुगीजकालीन पुलांचे बांधकामविषयक ऑडिट करण्याचे काम सुरू झाले होते.मंत्री ढवळीकर म्हणाले, की राज्यातील काही महामार्गाचे रुंदीकरण व अन्य साधनसुविधांची कामे होण्यामध्ये काही राजकारणी व काही लोक अडथळे आणत आहेत. यामुळे कामे वेळेत पूर्ण होण्यास विलंब लागतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही हे लक्षात आले आहे व त्यांनी त्याविषयी थोडी नाराजी व्यक्त केली. आम्ही सगळी कामे पूर्ण करू पण जर यापुढे राजकारण्यांनी किंवा लोकांनी एखाद्या प्रकल्पाला विरोधाचीच भूमिका घेतली तर ते काम केले जाणार नाही. काही ठिकाणी एखादे घर हलवावे लागले तरी, आक्षेप घेतला जातो. भू-संपादनाविषयीच्या अधिसूचना आम्ही जारी करत आहोत. कुणाचाही काही प्रश्न असेल तर त्यांनी माझ्या कार्यालयात येऊन समस्या मांडावी.दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मांडवी नदीवरील तिस-या पुलाच्या कामाची ढवळीकर व अन्य मंत्र्यांसोबत मंगळवारी पाहणी केली. जुवारी पुल व मांडवी पुल या दोन्ही पुलांच्या कामांसाठी चांगले कंत्रटदार गोव्याला लाभले आहेत. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होतील. मी अनेक प्रकल्प गोव्यात आणू पाहतो पण त्यासाठी येथील लोक व गोवा प्रशासनाचे सहकार्य हवे आहे. अन्यथा कंत्रटदार परत जातील.
राज्यातील 80 छोटे पुल नादुरुस्त, 50 टक्के ऑडिट पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 6:33 PM