पणजी: नववर्ष प्रारंभ आणि नाताळ या दोन्ही कारणामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी व्यवस्था लावली आहे. संपूर्ण राज्यभर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८०० पोलिसांची फौज तैनात करणार असल्याचे वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले आहे.
पर्यटनस्थळांवर या काळात अधिक लक्ष दिले जाईल. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त पोलीस रस्त्यावर वाहतुकीचे देखरेख करतील. एरवी सामान्य काळात वाहतूक नियंत्रणासाठी 500 पोलीस कर्मचारी तैनात असतात. आता ती तीनशे ने वाढवली जाईल. कळंगूट आणि बागा किनारपट्टीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सनबर्न महोत्सवासाठीही २६ डिसेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अल्कोमीटर घेऊन तैनात असतील. शुक्रवारी दिवसभरात २६ मद्यपी चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान डिसेंबरचे शेवटचे पाच दिवस तसेच नववर्षी दिनी अधिक काळजी घेऊन वाहने चालविण्याचे आवाहन त्यांनी केले. कुठाळी नदीवरील नवीन फुलाची दुसरी बाजू ही आता वाहतुकीस तयार झाल्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हा पूल 24 तारखेपासून खुला होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये झालेल्या बुकिंग्स आणि इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी राज्यात फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे.