- सदगुरू पाटीलपणजी : राज्यात पर्यटन मोसम सुरू होताच, समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक किंवा स्थानिक लोक बुडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मात्र गेल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या ६० घटनांवेळी एकूण ८१ व्यक्तींना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. यात बहुतांश पर्यटक आहेत.उत्तर गोव्यातील कळंगुट, सिकेरी, आश्वे, केरी आदी किनाऱ्यांवर अनेक घटना घडल्या. तसेच दक्षिण गोव्यातील पाळोळे आदी किनाऱ्यांवर गेल्या दोन आठवड्यांमध्ये साठ घटना घडल्याचे जीवरक्षकांचे म्हणणे आहे. एक-दोघांना आत्महत्त्या करताना वाचविले गेले. बार्देश तालुक्यातील जगप्रसिद्ध किनाऱ्यांपासून दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांपर्यंत सर्वत्र एकूण लाखो पर्यटक गेल्या दोन आठवड्यांत येऊन गेले. रुपेरी वाळूचे गोव्यातील किनारे पर्यटकांना मोहात पाडतात. येथील फेसाळत्या लाटांशी खेळण्याचा मोह पर्यटक आवरत नाहीत. काहीजण तर मद्य पिऊन पाण्यात उतरतात व मग मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. नाताळ सण व नववर्ष साजरे करण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात येऊन गेले. अजूनही काही देशी पर्यटक गोव्यात आहेत. गेल्या दोन आठवड्यात एक-दोघांचा बुडून मृत्यूही झाला.दि. १ जानेवारीपासून ३५ व्यक्तींना किनाऱ्यांवर वाचविले गेले. काहीजणांना किनाऱ्यांवर आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली. अशा चार व्यक्तींना वाचविले गेले. रुग्णवाहिका वगैरे बोलावून त्यांना वैद्यकीय मदत पुरविली गेली. पस्तीस देशी पर्यटकांना बुडताना वाचविले गेले. हरवलेल्या मुलांचाही छडा किनाऱ्यांवर लागला. दि. ३१ डिसेंबर ते दि. ३ जानेवारीपर्यंत एक ते पाच वर्षांची काही मुले किनाऱ्यांवर सापडली. तीन घटनांमध्ये हरवलेल्या मुलांची पुन्हा पालकांशी भेट झाली, असा जीवरक्षकांच्या दृष्टी यंत्रणेचा दावा आहे. दरम्यान, कळंगुट, कांदोळी, वागातोर केळशी अशा समुद्रात आज सोमवारी चार घटना घडल्या. सतराजणांचा गट कळंगुट येथे पोहत होता. त्यापैकी सोळा ते वीस वयोगटातील तिघेजण समुद्रात वाहून जाऊ लागले. त्यांना जीवरक्षकांनी वाचविले. तसेच वागातोर येथे बारा वर्षांहून कमी वयाच्या दोघा मुलांना बुडताना वाचविले गेले.
गोव्यात पर्यटन सुरू होताच ८१ व्यक्तींना बुडताना वाचवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 9:30 PM