पणजी: १३ खून प्रकरणात अटक करण्यात आलेला सिरियल कीलर आणि दोन खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला क्रूरकर्मा महानंद नाईकचा पेरोलवर तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपये रोख रकमेच्या अटी ऐवजी १ लाख रुपयांच्या हमीच्या अटीवर सोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने परवानगी दिली आहे. १३ पैकी दोन खून प्रकरणात जन्मठेप ठोठावण्यात आल्यानंतर गेली ९ वर्षे तुरुंगात असलेला महानंद नाईक याने पेरोलवर २८ दिवसांची सुट्टी मागितली होती. त्याला पेरोलवर सोडण्यास पोलिसांनी आक्षेप घेतला होता. तुरुंग महानिरीक्षक राजेंद्र मिरजकर यांनी महानंदचा अर्ज विचारात घेताना आणि त्याची तुरुंगातली वागणूक लक्षात घेत २१ दिवसांच्या पेरोलवर त्याला सुट्टी मंजूर केली. ती करतानाच १ लाख रुपये रोख रकमेची हमी देण्याचीही अट ठेवली.परंतु या १ लाख रुपयांच्या अटीसंबंधी सवलत द्यावी, यासाठी खंडपीठाकडे त्याच्या वकिलाने याचिका सादर केली होती. आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे १ लाख रोख रक्कम देऊ शकत नसल्याचे त्याने खंडपीठाला सांगितले. रक्कम माफ करण्याच्या त्याच्या मागणीला आक्षेप घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ते प्रवीण फळदेसाई यांनी त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याचे आणि दोन खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचे सांगितले. खंडपीठाने १ लाख रुपयांची हमी कायम ठेवली, परंतु ती रोख स्वरूपात देण्याची अट मागे घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे २१ दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येण्याचा महानंदचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलेचा खून करण्याच्या प्रकरणात २००९ रोजी महानंद नाईकला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर एकामागून एक गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या नावावर १३ गुन्हे नोंदले गेले होते. निरीक्षक सी एल पाटील यांनी या प्रकरणात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. ९ वर्षांच्या तुरुंगवासानंतर महानंद पहिल्यांदाच तुरुंगाबाहेर पडणार आहे.
९ वर्षांनंतर महानंद नाईक पडणार तुरुंगातून बाहेर, पेरोलची अट शिथील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:46 PM