पणजी : आॅक्टोबरमध्ये खाणी सुरू होणारच, अशी भीमगर्जना सरकारने केली असली तरी वेगवेगळ्या खाणी तसेच जेटींच्या ठिकाणी ९0 लाख टनांहून अधिक खनिज पडून आहे आणि त्याची उचल झाल्याशिवाय पूर्ण वेगाने हंगाम सुरू होणे कठीण आहे. पडून असलेल्या या खनिजमालासाठी आणखी किमान दहा ई-लिलाव करावे लागतील. खाण खात्याचे साहाय्यक संचालक पराग नगर्सेकर यांनी यास दुजोरा दिला. १५ लाख २७ हजार टनांचा बारावा ई-लिलाव मंगळवारी २९ रोजी होत आहे. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा ई-लिलाव ठरणार आहे. आॅक्टोबरमध्ये खाणी सुरू होणार असल्याने त्याआधी उपलब्ध सर्व खनिजाची विल्हेवाट लावण्यासाठी ई-लिलांवाचा सपाटा सरकारने लावला खरा; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घसरलेले दर यामुळे खनिजाला उचल नाही. अकराव्या ई-लिलावात ११ लाख १९ हजार टन खनिज विक्रीस काढण्यात आले. त्यापैकी केवळ ४ लाख टनांची विक्री झाली. बाराव्या आणि आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ई-लिलावात ४५ ग्रेडपासून ६0 ग्रेडपर्यंतचे खनिज आहे. शिरगाव येथील राजाराम बांदेकर माइन्स, पाळी येथील तिंबलो माइन्स, पाळी, होंडा, कोठंबी येथील चौगुले कंपनी, केळशी येथील साळगावकर मायनिंग इंडस्ट्रिजच्या खाणींवरील खनिज तसेच कोठंबी जेटीवरील बांदेकर ब्रदर्स माइन्सच्या खनिजाचा यात समावेश आहे. उचल नसल्याने मूळ बोलीचे दर कमी करावे म्हटले तरी त्याबाबतीत खाण खात्यासमोर अनंत अडचणी येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेख समितीच्या नियंत्रणाखाली लिलाव प्रक्रिया होत आहे. उत्खननाचा दर प्रति टन २५0 रुपये ठरवून दिलेला आहे. त्यामुळे हा दर सांभाळून व इतर खर्च जमेस धरूनच बोली निश्चित करावी लागते. ५00 रुपये टनांपेक्षा खाली बोली आणताच येत नाही, असे नगर्सेकर म्हणाले. हा लिलाव मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन (एमएसटीसी)च्या माध्यमातून होत आहे. (प्रतिनिधी)
९0 लाख टन खनिज पडून
By admin | Published: September 28, 2015 3:02 AM