पणजी : सरकारने गोवा पोलीस दलासाठी 902 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच या पदांवर भरती होणार आहे. नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पर्यटकांची वाढती संख्या तसेच कायदा सुव्यवस्थेचा विषय आणि अन्य प्रश्न असल्याने एकूण 1228 पदे भरण्यासाठी पोलीस दलाने मंजुरी मागितली होती.परंतु 902 पदे मंजूर करण्यात आली. आजवर गोवा पोलीस दलाला मंजूर झालेल्या मनुष्यबळाची एकूण संख्या 7 हजार 848 एवढी आहे. परंतु केवळ 6 हजार 51 पदे भरलेली आहेत. पोलिस शिपायापासून पोलीस अधीक्षकापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत आणि त्यांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. याआधी गोवा पोलिसांनी प्रस्ताव दिल्यानुसार पाच अधीक्षक, तेरा उपाधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, तीनशे उपनिरीक्षक, अडीचशे सहाय्यक उपनिरीक्षक आणि तीनशे हवालदार पोलीस शिपाई पदाची गरज असल्याचे म्हटले होते.मंजूर झालेल्या 902 पदांमध्ये कोणकोणत्या हुद्याची किती पदे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. अशी माहिती मिळते की, गेल्या काही वर्षात पोलिस शिपायांची घाऊक पदे निर्माण करण्यात आली. परंतु त्या तुलनेत हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, निरीक्षक, अधीक्षक यांची पदे निर्माण झाली नाही. पोलीस शिपायाला हवालदार पदी बढती मिळवण्यासाठी 20 ते 25 वर्षे काम करावे लागते. त्यामुळे शिपाई पदी सेवेत रुजू झालेल्या व्यक्तीला निवृत्त होईपर्यंत संपूर्ण कारकिर्दीत केवळ एकाच बढतीवर समाधान मानावे लागते.
गोवा पोलीस दलासाठी 902 पदे मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 2:28 PM