लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात डोंगर फोडीसाठी नगरनियोजन विभागाने एकही परवानगी दिलेली नाही. याउलट गेल्या अडीच वर्षांत बेकायदेशीरपणे डोंगर फोडल्याप्रकरणी सुमारे ९५० गुन्हे दाखल झाले आहेत, असे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. राणे यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला अचानक भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून तेथील स्थितीचा आढावा त्यांनी घेत रुग्णांशी संवाद साधला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, डोंगर फोडीसाठी नगरनियोजन विभागाकडून यापुढे एकही परवानगी दिली जाणार नाही. कुडतरीचे आमदार अॅलेक्स रेजिनाल्ड यांनी मला आधीच त्यांच्या मतदारसंघातील डोगर फोडीबाबत निवेदन दिले आहे. गेल्या अडीच वर्षांत आम्ही सुमारे ९५० बेकायदेशीर डोंगर फोडीबाबतचे गुन्हे दाखल केले आहेत. मागील सहा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत आमच्या विभागाने डोंगर फोडीसाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. अशा प्रकरणांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आणि संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच दिल्या आहेत.
बेकायदा डोंगर फोडण्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला मी पूर्णपणे सहमत आहे. दरम्यान, मंत्री राणे यांनी सांगितले की, रुग्णालयात जिल्हा डायलेसिससारख्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातील. नवीन आरोग्य सुविधा राबवाव्यात यासाठी सासष्टी तालुक्यातील सर्व आमदारांना विश्वासात घेतले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या सुधारणेसाठी त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.
हरित प्रकल्पांना चालना
मंत्री राणे म्हणाले की, 'राज्यात आम्ही हरित प्रकल्पांना चालना देऊ. आम्ही यापुढे गोव्यातील डोंगराळ भागात फोडाफोडीची आणि तिथे विकासाला परवानगी देणार नाही. राज्यात कोणत्याही डोंगर फोडीबाबत नगरनियोजन विभागाची भूमिका नाही.