पणजीः खोर्ली येथे रस्त्याने जाणाऱ्या कचरा वाहू गाडीच्या चाकाखाली २ वर्षे वयाचे मूल सापडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले आहे. आईच्या हातून सुटून हे मूल रस्त्यावर धावले होते. खोर्ली येथी ही हृदयद्रावक घटना घडली २ वर्षे वयाचा मुलगा आपल्या आईबरोबर दुकानात आला होता. आई दुकानात सामान खरेदी करण्यात व्यस्त असताना आईची नजर चुकवून मुलगा रस्त्यावर धांवला. त्याचवेळी रस्त्यावरून धावणाऱ्या टाटा एस या कचरावाहू गाडीखाली तो सापडला. वानचालकाने करकचून ब्रेक्स लावून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मुलगा चाकाखाली सापडला होता. तो गंभी रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी लगेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत त्याची प्रकृती चिंताजनकच होती.
या अपघाताच्या प्रकरणात कचरावाहू गाडीचे चालक मल्लिकार्जून मिरागी याला जुने गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच ते वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान राज्यात दर दिवसा अपघात होत आहेत आणि अपघाती मृत्युही होत आहेत. खोर्ली येथील या दुर्दैवी अपघातानंतर धारगळ येथे महामार्गावरही अपघाती मृत्यु झाला. दुचाकीस्वाराला ठोकर देऊन अज्ञात वाहनचालकाने पळ काढला. ही ठोकर इतकी जोरदार होती की दुचाकी चालक संजय जळवी हा जागीच ठार झाला. तो सिंधुदुर्ग येथील आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून हीट अँड रन करणाऱ्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.