वास्को: गुरूवारी (दि.१०) संध्याकाळी दक्षिण गोव्यातील नुवे महामार्गावरून भरधाव वेगाने वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या टॅक्सी चारचाकीने फादर आग्नेल आश्रम जंक्श्नसमोर दुचाकीला जबर धडक देऊन झालेल्या अपघातात २७ वर्षीय दुचाकी चालक आकाश गावडा याचा दुर्देवी अंत झाला. दामोदर नाईक (वय ४४, रा: काणकोण) नुवे येथून वेर्णाच्या दिशेने तो चालवणारी टॅक्सी भरधाव वेगाने हाकत येताना फादर आग्नेल आश्रम जंक्शनवर त्याचा स्टीअरींगवरील ताबा जाऊन त्यांने तेथून जाणाºया आकाश गावडा याच्या दुचाकीला जबर धडक दिल्याची प्रथम माहीती वेर्णा पोलीसांना चौकशीवेळी मिळाली आहे. वेर्णा पोलीसांनी ह्या अपघात प्रकरणात टॅक्सी चालक दामोदर नाईक विरुद्ध भादस २७९, ३०४ ए कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, संध्याकाळी ६.०५ च्या सुमारास तो अपघात घडला. कोणकोण येथील दामोदर नाईक नामक चालक तो चालवणारी टॅक्सी (जीए ०८ व्ही ०३१६) घेऊन भरधाव वेगाने नुवे हून वेर्णाच्या दिशेने जात होता. जेव्हा तो माटोल - वेर्णा येथील फादर आग्नेल आश्रम जंक्शन जवळ पोचला त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या चारचाकीच्या स्टीअरींगवरील त्याचा ताबा सुटला अशी माहीती पोलीस सूत्रांनी दिली. याचवेळी कुठ्ठाळी हून नुवेच्या दिशेने जाणाºया दुचाकीवर (जीए ०८ एआर ७४६१) दामोदर नाईक याच्या टॅक्सीने जबर धडक दिली. ह्या अपघातात दुचाकीवर असलेला आकाश गावडा (रा: मात्तीमोरोड, सेंट जुझे दी आरीयल, सासष्टी) रस्त्यावर फेकला जाऊन तो गंभीररित्या जखमी झाला. अपघातानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या आकाशला त्वरित उपचारासाठी मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मरण पोचलेल्या आकाश ने दुचाकी चालवताना हॅल्मेट घातले होते अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. ती टॅक्सी चारचाकी अपघातावेळी एकदम भरधाव वेगाने होती असे घटनास्थळावरील लोकांकडून चौकशीवेळी कळाल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. वेर्णा पोलीसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.