पंकज शेट्ये/वास्को: पिशे डोंगरी - खारीवाडा, वास्को येथे राहणाऱ्या ७० वर्षीय गायत्री मराठे नामक वृद्ध महिलेच्या गळ्यावर सुरीने हल्ला करून तिचा खून केल्याची घटना रविवारी (दि.२१) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास पोलिसांसमोर उघडकीस आला. गायत्री घरात एकटीच राहत असून तिचा खून कोणी आणि कशासाठी केला त्याबाबत वास्को पोलीस सर्व मार्गाने चौकशी करीत आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गायत्री मराठे ह्या वृद्ध महिलेच्या पतीचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला असून तिला मुले नसल्याने ती त्या घरात एकटीच रहायची. कधी कधी गायत्रीची विचारपूस करण्यासाठी तिच्या शेजाऱ्याला राहणारी एक मुलगी तिच्या घरी यायची. रविवारी संध्याकाळी ती मुलगी गायत्रीच्या घरी आली असता तिला घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. विचारपूस करण्यासाठी आलेली ती मुलगी घरात गेली असता गायत्री घरात जमनीवर पडल्याचे तिला दिसून आले. तिने लगेच बाहेर येऊन शेजाऱ्यांना माहीती दिल्यानंतर त्या घटनेची पोलीसांना माहीती देण्यात आली. वास्को पोलीसांना त्वरित घटनास्थळावर धाव घेतली असता जमनिवर कोसळलेल्या गायत्रीचा मृत्यू झाल्याचे त्यांना आढळून आले. तसेच तिच्या गळ्यावर धार धार हत्याराने (सुरी - कटर सारखी वस्तू) हल्ला केल्याचे पोलीसांना तपासणीत आढळून आले. गायत्रीच्या गळ्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेले हत्यार तिच्या मृतदेहाजवळच घरात पडलेले असल्याचे पोलीसांना तपासणीत आढळून आल्याची माहीती सूत्रांनी दिली.
गायत्री नामक वृद्ध महिलेचा खून कोणी आणि कशासाठी केला त्याबाबत वास्को पोलीस सर्व मार्गाने चौकशी करीत आहेत. तिच्या खूना मागे चोरीचा उद्देश होता की अन्य कारण होते त्याबाबतही पोलीस चौकशी करीत असल्याची माहीती सूत्रांनी दिली. पिशेडोंगरी - खारीवाडा येथे राहणाऱ्या गायत्रीचा खून झाल्याचे कळाल्यानंतर पोलीसांनी वाडे, वास्को येथे राहणाऱ्या गायत्रीच्या बहिणीच्या मुलाला त्याबाबत माहीती देऊन त्याला तेथे बोलवले. पिशेडोंगरी, वास्को येथे राहणाऱ्या गायत्री नामक वृद्ध महिलेचा खून झाल्याची माहीती शहरात पसरताच पुन्हा एकदा लोकात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. खून झाल्याचे कळताच अनेक लोकांनी गायत्रीच्या घराबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. गायत्री नामक वृद्ध महिलेच्या खून प्रकरणात वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.
गेल्या आठवड्यात वाडे, दाबोळी येथे राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केल्याची घटना घडल्यानंतर नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या प्रकरणात वास्को पोलीसांनी त्वरित कारवाई करून २४ तासात त्या मुलीचा बलात्कार आणि खून केलेल्या दोन्ही आरोपींना गजाआड करून अटक केली होती. रविवारी संध्याकाळी एका वृद्ध महिलेच्या गळ्यावर हल्ला करून तिचा खून केल्याची घटना घडल्याने लोकात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. हा खून चोरीच्या उद्देशाने की अन्य कुठल्या कारणामुळे केला आहे त्याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.