म्हापसा: काशिराम म्हांबरे
कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातुन पळून जाण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर कारागृहातील दोघा मेट्रन तसेच सुरक्षा रक्षकावर हल्ला करुन त्यांना मारहाण केल्या प्रकरणी युगांडा देशाची महिला कैदी मिनाफू हफुसा हिच्या विरोधात कोलवाळ पोलीस स्थानकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारागृहाचे अधिक्षक शंकर गांवकर यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली होती. घटना २३ रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती. कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न तेथील सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. त्यामुळे संशयिताने मुख्य प्रवेशव्दारावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अस्मा खान, जयश्री चोडणकर आणि आशा वेंगुर्लेकर यांचा चावा घेऊन त्यांच्यांवर सेफ्टी स्टिकनेवार करुन त्यांना जखमी केले होते. त्यात त्यांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सध्या संशयिता विरोधात एका खून करणात म्हापसातील जलदगती न्यायालयात खटला सुरु आहे. त्यासाठी तिला कोलवाळ येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास कार्य पोलिसांकडून आरंभण्यात आले आहे.