लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : धारगळ राष्ट्रीय महामार्ग ६६ वर रविवारी दरड कोसळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून मालपे बायपासजवळ दरड कोसळण्याची ताजी घटना आज घडली. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळून एकेरी मार्ग बंद झाला होता, त्याच जागी पुन्हा दरड कोसळली. या परिसरात कंत्राटदाराने बॅरल आडवे लावून तेथे पट्ट्या लावल्या आहेत. आणखी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ वर सुरू असलेल्या कामाबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा फटका बसत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. गेल्यावर्षी महाखाजन परिसरात दरड कोसळून एकेरी मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे सलग दीड ते दोन महिने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी तब्बल वर्ष लागले.
गेल्यावर्षी कंत्राटदाराने महाखाजन येथे रस्त्यालगतचा डोंगर सरळ उभ्या रेषेत कापला होता. तो कर्व्ह पद्धतीने कापला असता तर दरड कोसळण्याची घटना घडली नसती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. महाखाजन येथे आता दुसऱ्यांदा दरड कोसळली आहे. त्या भागातील अर्धा अधिक डोंगर कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता रुंदीकरणासाठी जेवढी जागा संपादित केली होती, तेवढाच डोंगर कापण्यात आला. आता अतिरिक्त डोंगर कापायचा असल्यास जमीन मालकाची परवानगी आवश्यक आहे. जर डोंगर शास्त्रीय पद्धतीने कापला नाही, तर केव्हाही डोंगराचा अर्धा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. रात्रीच्या वेळी अचानक भर पावसात दरड कोसळली आणि वाहने ये-जा करीत असली तर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. डोंगरावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाची साठवण टाकी आहे. या टाकीलाही धोका संभवत आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
गेल्यावर्षी दरड कोसळलेल्या ठिकाणी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर आणि सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कंत्राटराला सूचना केल्या होत्या. त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मालपे बायपासजवळ ज्या पद्धतीने दरड कोसळते, त्याच पद्धतीने महाखाजन येथे दरड कोसळत आहे. सरकारने वर्षभर कोणतीच उपाययोजना केलेली नाही. त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक रोहिदास हरमलकर यांनी केली आहे.