फोंडा (यामिनी मडकईकर): बोरी येथे गेल्या काही दिवसांपासून लोकवस्तीमध्ये येऊन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शुक्रवारी सकाळी वनखात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. दरम्यान, सकाळी सहाच्या सुमारास बिबट्या बेतकी येथून बोरी पुलाच्या सर्कलपर्यंत अक्षरश: फेरफटका मारत राहिला. वाड्यावर फिरणाऱ्या या बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. सुदैवाने बिबट्याने कोणातही दुखापत केली नाही.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबटा मागील काही दिवसापासून शिरशिरे, दब कुड्याळ वाड्यावर दिवसा आणि संध्याकाळीही दिसत होता. गेल्या शुक्रवारी गावातील काही युवकांना तो स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ दिसला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी वनखात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळविले होते. आठवडाभरात बिबट्याचा वावर अधिकच वाढल्याने दहशतीचे वातावरण होते. या बिबट्याने शिरशिरे ते देऊळवाडा मार्गावरू बेतकी, खार्जोडा या परिसरात भ्रमंती केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुरुवारी दुपारी बिबटा खार्जोडा येथील वाड्यावर व श्री साईबाबा मंदिर परिसरात फिरताना दिसत होता. शुक्रवारी तो बोरी पुलाच्या सर्कलवर फिरत होता. यावेळी डुकरांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे वापरून बिबट्याला पकडण्यात आले. त्याला वन खात्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, स्थानिक तरुणांच्या मते बोरी येथे हा एकच बिबट्या नसून आणखी काही बिबटे आहेत. यासंदर्भाचे व्हिडिओही नागरिकांनी वनखात्याला दिले आहेत.