वास्को: खात्रीलायक सूत्रांनी माहीती दिल्यानंतर वास्को पोलीसांनी नवेवाडे येथील वाडेनगर इंगलीश हायस्कूल विद्यालयाबाहेर असलेल्या मैदानाच्या परिसरात छापा मारून २३ वर्षीय तरुणाशी असलेल्या दुचाकीतून एक कीलो गांजा अमली पदार्थ जप्त केला. नवेवाडे, वास्को येथे राहणाºया २३ वर्षीय रोहन सरोज याच्याशी असलेल्या दुचाकीतून एक कीलो गांजा जप्त केल्यानंतर पोलीसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करून त्याला अटक केली.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी पहाटे ३.२० च्या सुमारास रोहन सरोज नामक २३ वर्षीय तरुणाला अटक केली. नवेवाडे येथील वाडेनगर इंगलीश हायस्कूल विद्यालयाबाहेर असलेल्या मैदानाच्या परिसरात अमली पदार्थाचा व्यावहार होणार असल्याची खात्रीलायक माहीती पोलीसांना मिळाली. माहीती मिळताच सोमवारी (दि.२६) रात्री १०.४५ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहन नागरशेकर आणि इतर पोलीसांनी तेथे जाऊन अमली पदार्थाचा व्यावहार करण्यासाठी येणाºयाला गजाआड करण्याकरिता सापळा रचला. काही वेळाने एक तरुण तेथे दुचाकीने आल्याचे पोलीसांना दिसले. त्याचे हावभाव संशयास्पद असल्याचे आढळून येताच पोलीसांनी त्याला अडवून त्याची झडती घेतली. तसेच त्याच्याशी असलेली दुचाकी (क्र: जीए ०६ व्हाय ७२३१) तपासली असता दुचाकीत एक कीलो गांजा अमली पदार्थ लपवून ठेवल्याचे पोलीसांना दिसून आले.
पोलीसांनी त्वरित गांजा जप्त करण्याबरोबरच त्या तरुणालाही ताब्यात घेतला. त्याच्याशी चौकशीला सुरवात केली असता त्याचे नाव रोहन सरोज असे असून तो नवेवाडे भागातील असल्याचे पोलीसांसमोर उघड झाले. ह्या प्रकरणात नंतर पोलीस उपनिरीक्षक रोहन नागरशेकर यांनी तक्रार नोंद करताच एक कीलो गांजासहीत रंगेहात पकडलेल्या रोहन सरोज विरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या २०(बी)(२)(बी) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. छापा मारून पोलीसांनी जप्त केलेल्या त्या गांजाची कींमत सुमारे एक लाख रुपये असल्याची माहीती पोलीसांनी दिली. अटक केलेला रोहन सरोज तो गांजा घेऊन कोणाला विकण्यासाठी आला होता की अन्य उद्देशाने तो गांजा घेऊन आला होता त्याबाबत पोलीस त्याच्याशी चौकशी करित आहेत. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक अधिक तपास करित आहेत.