वास्को: माटवे दाबोळी येथील विहिरीच्या पाण्यात पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्याचे कारण १५ दिवसानंतर अखेरीस उघड झाले. मुरगाव बंदरातून साकवाळ येथील झुआरी आय ए व्हि प्रा लि व्यवस्थापनात पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या १४ कीलोमीटर अंतराच्या भूमीगत वाहीनीच्या थोड्या भागाला गंज लागून छिग्र पडल्याने वाहिनीतून पेट्रोलियम पदार्थाची गळती झाल्याचे मंगळवारी दुपारी ३ वाजता उघड झाले. वाहिनीला कुठे गळती लागली आहे याच्या तपासणीचे काम चालू असताना दाबोळी वालीस जंक्शन जवळ वाहिनीच्या थोड्या भागाला गंज लागून छिद्र पडल्याने तेथून गळती होत असल्याचे उघड झाल्याची माहिती मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनी दिली.
२७ नोव्हेंबर रोजी माटवे दाबोळी येथील एका विहिरीत पेट्रोलियम पदार्थ झिरपून विहिरीचे पाणी दुषीत झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी तेथील नाल्यात आणि लोकांच्या बागायतीत - शेतजमिनीत पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत झाल्याचे उघड झाले. पेट्रोलियम पदार्थ विहिरीच्या पाण्यात, बागायतीत - शेतजमिनीत मिसळल्याने पाणी दुषीत होण्याबरोबरच तेथील झाडे, माड इत्यादी मालमत्तेची नुकसानी होण्याची भिती नागरिकांकडून व्यक्त केली होती. साकवाळ महामार्गाजवळ झुआरी आय ए व्ही प्रा लि व्यवस्थापनात मुरगाव बंदरात जहाजाद्वारे येणाऱ्या पेट्रोलिय पदार्थाचा (पेट्रोल, डीझल इत्यादी) साठा करून ठेवला जातो. मुरगाव बंदरातून साकवाळ येथील झुआरी आय ए व्हि प्रा लि व्यवस्थापनात पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या १४ कीलोमीटर अंतराच्या भूमीगत वाहिनीला कुठेतरी गळती लागल्याने पेट्रोलियम पदार्थ विहिरीच्या पाण्यात, नाल्यात, बागायतीत आणि शेतजमनीत मिसळल्याचा दाट संशय निर्माण झाला होता. त्यामुळे झुआरी आय ए व्ही प्रा लि कंपनीने खोदकाम सुरू करून वाहीनीला कुठे गळती लागली ते शोधून काढण्याचे काम सुरू केले होते.
सुरुवातीचे काही दिवस उलटले तरीही वाहिनीला कुठे गळती लागली आहे ती मिळत नसल्याने नंतर झुआरी आय ए व्ही पी व्यवस्थापनाने दुसऱ्या राज्यातून एक तज्ञ कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि नंतर पंजाबहून एका श्वान पथकाला गळती शोधून काढण्यासाठी पाचारण केले होते. त्या कंपनीने आणि श्वान पथकाने काही ठिकाणी गळती असण्याची शक्यता दर्शविल्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम करून वाहीनीची तपासणी करण्यास सुरवात केली होती. १५ दिवसानंतर अखेरीस मंगळवारी (दि.१२) दुपारी ३ वाजता झुआरी आय ए व्ही प्रा लि कंपनीला पेट्रोलियम पदार्थाची कुठून गळती होत होती ती सापडली. दाबोळी वालीस जंक्शन जवळून जाणाऱ्या वाहिनीच्या थोड्याशा भागाला गंज लागल्याने छिद्र पडून पेट्रोलियम पदार्थाची गळती होत असल्याचे खोदकाम करून तपासणी करताना आढळून आले. तेथे खोदकाम सुरू केल्याच्या काही मिनिटानंतर मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थाचा वास येण्यास सुरवात झाल्यानंतर तेथेच वाहीनीला गळती लागल्याचा प्रथम अंदाज निर्माण झाला. त्यानंतर वाहिनी तपासणीचे काम जोरात सुरू केल्यानंतर तेथे वाहिनीला छिद्र आढळून आले.त्याबाबत अधिक माहितीसाठी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांना संपर्क केला असता वाहीनीला कुठे गळती लागली होती ते आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. जेथे वाहिनीला छिद्र पडला होता तेथून सुमारे ५०० ते ९०० मीटर अंतराच्या खालच्या भागात पेट्रोलियम पदार्थ मिसळल्याने पाणी दुषित झालेली ती विहिर आहे.
झुआरी आय ए व्ही पी कंपनीचे अधिकारी शिवप्रसाद नायक यांना संपर्क केला असता लवकरच वाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक करून ह्या एकाच ठिकाणी वाहिनीला छिद्र पडल्याचे जाणवत असलेतरी दोन दिवसानंतर मलेशियाहून एक तज्ञ कंपनी पूर्ण वाहिनीची तपासणी करण्यासाठी गोव्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली. ही वाहिनी २२ वर्षीय जुनी असलीतरी वाहिनीच्या देखभालीचे काम वेळोवेळी केले जाते. मलेशियाहून येणारी कंपनी वाहिनीची पूर्ण तपासणी करून जेथे देखभालीचे काम पाहीजे ते व्यवस्थीतरित्या केले जाणार आहे. सद्या बंद असलेली ही वाहिनी पुन्हा एकदा पेट्रोलियम साठा वाहून नेण्यासाठी सुरक्षित असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्याबाबत अहवाल प्रशासनाला पाठवण्यात येणार आहे. प्रशासनाने परवानगी दिल्यानंतरच वाहिनीतून पुन्हा पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्याच्या कामाला सुरवात केली जाणार असल्याचे शिवप्रसाद नायक यांनी सांगितले.