पणजी : नवे शॅक्स धोरण हे शॅक्स व्यवसायिकांवर अन्याय करणारे आहे. पारंपरिक शॅक्सव्यवसायिकांना डावलून बाहेरच्यांना या व्यवसायात प्रवेश देण्याचा हा डाव असू शकताे असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. नवे शॅक्स धोरणाची प्रक्रिया पारदर्शक असावी. सर्वांना विश्वासात घेऊनच ते ठरवावे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खवटे यांना पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई म्हणाले, की नवे शॅक्स धोरणानुसार शॅक्ससाठी अर्ज करण्यास ६० वर्षांची वयोमर्यादा ठेवली आहे. या अटींमुळे जे पारंपरिक शॅक्स व्यवसायिक अनेक वर्षापासून या व्यवसायात आहेत, त्यांना डावलून भलत्यांनाच प्रवेश देण्याचा डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. शॅक्स धोरण हे शॅक्स व्यवसायिकांसाठी लाभदायक असावे. परंतु उलट येथे त्यांना या व्यवसायातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. किनाऱ्यांवरील शॅक्स हे त्याच भागात राहणाऱ्या शॅक्स व्यवसायिकांचे असावेत. अन्य भागांतील ते नसावेत. त्यामुळे सरकारने चुकीच्या धोरणाला प्रोत्साहन देवू नये.शॅक्स धाेरणाच्या नावाखाली सरकारने पारंपरिक शॅक्समालकांचा विश्वासघात करु नये अशी मागणी त्यांनी केली.