मडगाव : गोव्यातील मडगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री एका कारवाईत मूळ नेपाळ देशातील एकाला पकडून त्याच्याकडील चरस जप्त केला. हिमल मल्ला असे संशयिताचे नाव असून, तो अठरा वर्षाचा आहे. त्याच्याकडे २५० ग्राम चरस सापडला . त्याची किंमत अंदाजे १ लाख २५ हजार इतकी असल्याची माहिती मडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली. संशयित गुरुवारीच रेल्वेतून मडगावात आला होता. पोलिसांना त्याच्याबाबत पक्की माहिती मिळाली होती. पोलीस त्याच्या पाळतीवर होते. येथील लिंकरोड येथे संशयित पोहचला असता, पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले. व नंतर झडती घेतली असता, त्याच्याकडे वरील चरस सापडला. हा चरस कुठून व का आणला होता याचा सदया पोलिस शोध घेत आहेत.
संशयिताने सदया तरी आपले तोंड उघडलेले नाही. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्याखाली त्याच्यावर सदया पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. दक्षिण गोव्याचे सदयाचे पोलिस अधिक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक संतोष देसाई, पोलिस निरिक्षक तुळशीदास नाईक, उपनिरीक्षक समीर गावकर व विश्वजीत ढवळीकर यांनी संशयिताला पकडण्याच्या मोहिमेत भाग घेतला.