पणजी : सुधारित महागाई भत्त्यात लागू न केल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व सहकार भंडारचे कर्मचारी काम बंद ठेवून मंगळवारी एक दिवसीय संपावर गेले. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी पणजी येथील सहकार भंडार समोर जोरदार निदर्शने केली. महागाई भत्ता लागू न केल्यास पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अखिल गोवा सहकारी कामगार संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुभाष नाईक जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता.
जॉर्ज म्हणाले, की गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग ॲण्ड सप्लाय फेडरेशन लिमिटेड अंतर्गत हे सहकार भंडार कार्यरत आहेत. सहकार भंडार मध्ये रोजंदारीचे मिळून एकूण ३०० कर्मचारी काम करतात. दरवर्षी या कर्मचाऱ्यांना सुधारीत महागाई भत्ता लागू केला जातो. या महागाई भत्यात दर महिन्यांनी वाढ केली जाते. महागाई भत्त्यात १ जानेवारी २०२३ पासून ४२ टक्के वाढ केली आहे. तर सेटलमेंट करताना ही वाढ १ जुलै २०२३ पासून ४६ टक्के देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र महागाई भत्ता या कर्मचाऱ्यांना लागू केला नसल्याचे त्यांनी सांगितले.