पंकज शेट्ये, वास्को: दिल्लीहून गोव्यात येण्यासाठी उड्डाणावर असलेल्या इंडीगो विमानातील एका प्रवाशाने आकाशात विमानाचा दरवाजा (स्टारबोर्ड डोर) उघडण्याचा प्रयत्न करून इतर प्रवाशांचा आणि क्रु सदस्यांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरुद्ध दाबोळी विमानतळ पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलेला प्रवाशी राजस्थान येथील असल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.
दाबोळी विमानतळ पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सोमवारी (दि.२५) दुपारी १२ च्या सुमारास ती घटना घडली. दिल्लीहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर येण्यासाठी इंडीगो विमानाने उड्डाण घेतली होती. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटाने एका ४० वर्षीय प्रवाशाने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने विमानातील ‘वॉर्निंग लाईट’ चालू झाल्या. त्यामुळे विमानात असलेल्या इतर प्रवाशात आणि क्रु सदस्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. विमानातील क्रु सदस्यांनी त्वरित पावले उचलून सर्व काही सुरक्षित असल्याची नंतर खात्री करून घेतली. नंतर विमान सुरक्षितरित्या दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित विमान व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची तक्रार दाबोळी विमानतळ पोलीसांना दिली.
दाबोळी विमानतळ पोलीसांनी राजस्थान येथील त्या ४० वर्षीय इसमा विरुद्ध भादस ३३६ कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. हवेत असलेल्या विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करणारा तो प्रवासी व्यापारी असल्याची माहीती प्राप्त झाली. दाबोळी विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.