मडगाव: उपचारासाठी दाखल केलेल्या एका रुग्णाने इस्पितळातील टॉयलेटमध्ये जाउन आत्महत्या करुन जीवन संपविण्याची खळबळजनक घटना गोव्यातील सासष्टीतील. कुडतरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली असून, मयताचे नाव मिंगेल पेरेरा (५९) असे आहे. तो कुडतरीतील खोर्जे येथील रहिवाशी असून, तो मधुमेहाने त्रस्त होता अशी माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली आहे.
आज साेमवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान वरील घटना घडली. मिंगेल हा अविवाहित होता. त्याला एक बहिण असून, तीही अविवाहीत आहे. दोन महिन्यापुर्वी त्याला पायाला इजा पोहचली होती. मधुमेहामुळे पायाचा विकार वाढत चालला होता. ५ एप्रिल रोजी त्याला नंतर कुडतरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर तेथे उपचार चालू होते. या आरोग्य केंद्रात त्याच्यासोबत केअरटेकर म्हणून त्याची बहिणही होती.
साेमवारी सकाळी लघुशंकेचे निमित्त करुन तो टॉयलेटमध्ये गेला व त्याने कपडयाने गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ होउनही टॉयलेटमध्ये गेलेला आपला भाउ बाहेर येत नसल्याने तिच्या बाहिणीने टॉयलेटचा दरवाजा ठोठावला असता, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर दार उघड केले असता, आता मिंगेलने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
नंतर या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफ्फुल गिरी यांनी घटनास्थळी जाउन पंचानामा केला. येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह मयताच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.