पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कथित घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याच्या निषेधार्थ पणजी येथील आझाद मैदानावर निषेध करण्यात आला आणि शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र यावेळी विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे वातावरण तापले होते. मात्र त्यांनर सर्वांना मैदानात प्रवेश देण्यात आला आणि इंडिया आघाडीने शक्तीप्रदर्शन घडवले.
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष ॲड. अमित पालेकर, आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस, आमदार क्रुज सिल्वा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव, आमदार आल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा व अन्य नेते उपस्थित होते. या आंदोलनाची चाहूल पोलिसांना लागल्याने आझाद मैदान परिसराला अक्षरश: छावणीचे स्वरुप आले होते. आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठया संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. आमदार तसेच राजकीय पक्षाचे नेते येताच त्यांना अडवले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करुन पोलिसांनी त्यांना आझाद मैदानात प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस व त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पण अखेर त्यांना आझाद मैदानावर प्रवेश देण्यात आला.