फोंडा- फोंडा परिसरात झाडे उन्हाळून पडण्याच्या घटना घडतच असून अशाच एका घटनेत शुक्रवारी दुतळे -मडकई येथे सखाराम नाईक यांच्या मालकीच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असून ,घरात राहणारे पती-पत्नी जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी दुपारी घडली असून सखाराम नाईक व त्याची पत्नी उत्तरा ह्या जखमींना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून संध्याकाळी उशिरापर्यंत झाड बाजूला केले.
सविस्तर माहितीनुसार सखाराम नाईक यांच्या घराच्या बाजूला असलेले आंब्याचे झाड हे धोकादायक बनले होते .ते कधीही उन्माळून पडेल अशी स्थिती तेथे निर्माण झाले होती. ह्या दिवसात पडत असलेल्या पावसाने झाड आणखीनच कमकुवत झाले व शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सदरचे मोठे आंब्याचे झाड घरावर कोसळले. त्यावेळी घरात पती पत्नी व त्यांचा सहा वर्षाचा मुलगा मोहित हजर होता. झाड कोसळण्याच्या आवाज ऐकून सखाराम नाईक यांनी आपल्या मुलाला पकडून पोटाकडे ठेवले. घराच्या भिंतीचे अवशेष सखाराम नाईक यांच्या पाठीवर पडून त्यांना जखम आली. त्याचबरोबर घराच्या दुसऱ्या भागात काम करत असलेल्या पत्नीवरही झाडाच्या फांद्या पडून ती जखमी झाली. जखमी झालेल्या पती - पत्नीला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले.
सदर धोकादायक स्थितीत असलेलं मोठे झाड कापण्यासाठी सखाराम नाईक यांनी मूळ जमीन मालकाकडे परवानगी मागितली होती. परंतु परवानगी मिळण्यास तांत्रिक कारणाने दिरंगाई होत असल्याने झाड कापण्याची प्रक्रिया लटकली होती.परवानगी शुक्रवारी झाड संपूर्ण घरावर कोसळून नाईक कुटुंबीयांचा संसार उघड्यावर पडला आहे.
सदर घटनेची माहिती मिळाल्यावर सरपंच शैलेंद्र पणजीकर व पंच सदस्य विनोद नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी झाड हटवण्यासंबंधी मदतकार्य सुरू केले. नुकसानग्रस्त सखाराम याला सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी पंचायततर्फे काही प्रमाणात मदत दिली जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे.