पणजीः येत्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने गोव्यात एकही जागा न लढविण्याचा निर्णय जाहीर करून दोन्ही ठिकाणी आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला आहे. भाजपच्या पराभवासाठी ही रणनीती पक्षाने स्वीकारली आहे.
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अमित पालयेकर यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचा चंग इंडी आघाडीने बांधला आहे. त्यासाठी गोव्यातील सर्वच भाजप विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राज्यातील गोवा फॉरवर्ड, मगो या पक्षांसह तिन्ही अपक्ष आमदारांनीही इंडी आघाडीमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यावेळी सांगितले.
अमित पालयेकर यांनीही भाजपच्या पराभवासाठी ही रणनीती आपने तयार केल्याचे सांगितले. आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीतील बैठकीतील गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आपने काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करू. इंडी आघाडी म्हणून संघटितपणे लढू, असे पालेकर म्हणाले.
आरजी पक्षाने दोन्ही जागांवर निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाविषयी विचारले अशता पालयेकर म्हणाले की आरजी पक्ष भाजपविरोधी मतांचे विभाजन करून भाजपला फायदा करून देऊ इच्छित आहे. परंतु इंडी आघाडी असे होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.