लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आम आदमी पक्षाची गोवा राज्य कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. मात्र, राज्य निमंत्रक अमित पालेकर यांचे पद बरखास्त करण्यात आलेले नाही. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांनी ही घोषणा केली आहे.
आपने राज्य कार्यकारिणी फेररचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तूर्त केवळ राज्य निमंत्रक पालेकर हे एकटेच पदावर राहणार असल्यामुळे राज्यात पक्षातर्फे ते केवळ एकटेच अधिकृतपणे बोलू शकणार आहेत. नवीन कार्यकारिणीची निवड होईपर्यंत पालेकर हेच पक्षाची गोव्यातील सर्व सूत्रे हाताळणार आहेत.
नवीन कार्यकारिणी नियुक्तीची प्रक्रियाही हाती घेण्यात आली असून, ती लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली. नवीन कार्यकारिणीत काही नवीन चेहरेही दिसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या गोवा राज्य कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे हायकमांडच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळीच कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, राज्य विधानसभेत आपचे दोन आमदार आहेत. त्यामुळे लोकांच्याही त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक विचारात घेत नवीन कार्यकारिणी निवडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.