किशोर कुबल, पणजी: आम आदमी पक्षाने कॉंग्रेससह सर्वांनाच धक्का देत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगश यांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकारांना ही माहिती देताना दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात वेंझी हे आपचे उमेदवार असतील, असे सांगितले. पक्षाचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेंझी यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे.
ॲड. पालेकर म्हणाले की, ‘ विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे घोडे काही पुढे जात नाही. तीस दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यानंतर विषय पुढे गेलेलाच नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आणी वेंझी यांची उमेदवारी जाहीर केली. सर्व विरोधी पक्षांनी आपच्या या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन पालेकर यांनी केले आहे.
अचानक उमेदवार का जाहीर केला हे कोडेच: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे कि, आपने अचानक उमेदवार का जाहीर केला हे कोडेच आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ युतीबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि विविध राज्यांतील जागा लढविण्याबाबत निर्णय इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते घेत आहेत. असे असताना व लोकसभेत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधीत्व कॉंग्रेस पक्षाचे खासदार फ्रांसिस सार्दिन करीत असताना कॉंग्रेसला अंधारात ठेवून आपने अचानक उमेदवार का जाहीर केला, हे कोडेच आहे.