लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यासाठी आम आदमी पक्ष तयार झाला आहे. आमदार वेंझी व्हिएगश हे आता उमेदवार नसतील, असे वृत्त एका राष्ट्रीय चॅनेलने दिल्लीत काँग्रेस व आपच्या बैठकीचा हवाला देऊन दिले आहे.
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गेल्याच आठवड्यात दक्षिणेतून वेंझी यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर ४८ तासातच आपचे गोवा निमंत्रक व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर दिल्लीला जाऊन केंद्रीय नेत्यांकडे संयुक्तपणे चर्चा करून आले होते. 'इंडिया' युती गोव्यातही होईल व युतीचा उमेदवार म्हणून काँग्रेस व आप संयुक्त उमेदवार देईल, असे या नेत्यांनी दिल्ली भेटीनंतर म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत काँग्रेस व आपच्या केंद्रीय नेत्यांची बैठक झाली. सूत्रांचा हवाला देऊन राष्ट्रीय चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, वेंझी व्हिएगश उमेदवारी भरणार नाहीत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिला जाईल व काँग्रेस तेथे आपला उमेदवार उभा करील, असे ठरले आहे. काल झालेल्या बैठकीत दिल्ली, गुजरात, गोवा, चंडिगढ व हरयानातील लोकसभा मतदारसंघांच्या बाबतीत आप व काँग्रेसमध्ये समझोता झालेला आहे, असे या राष्ट्रीय चॅनलने वृत्तात म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप दिल्लीहून कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
दिल्ली येथे आम आदमी पक्ष व काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांची जागा वाटपाबाबत झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. गोव्याबाबत बोलणी अजून अपूर्णच आहे. मला कोणीही काहीही कळवलेले नाही. आज शुक्रवारी दुपारपर्यंत काय ते स्पष्ट होईल. मात्र, काँग्रेस दक्षिणचा जागा आपला देण्यास तयार आहे. - वेंझी व्हिएगश, आमदार