ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 18 - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी आपले आणखी चार उमेदवार जाहीर केले. बेकायदा खाणविरोधी चळवळीतील तरूण कार्यकर्ते रविंद्र वेळीप यास सांगे मतदारसंघात तर अपेक्षेप्रमाणो एल्वीस गोम्स यांना कुंकळ्ळी मतदारसंघासाठी आपने उमेदवारी बहाल केली आहे.
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य दिनेश वाघेला व वाल्मिकी नायक यांच्या उपस्थितीत आपची पत्रकार परिषद झाली. पर्वरी मतदारसंघातून पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे पंच सदस्य राजेश वळवईकर यांना तर ताळगाव मतदारसंघातून सिसिली रॉड्रीग्ज यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. 34 वर्षीय सिसिली ही विद्यालयांमध्ये नृत्य शिक्षणाचा कार्यक्रम राबवते. 46 वर्षीय वळवईकर हे दोनवेळा पेन्ह द फ्रान्सचे पंच बनले. ते खारवी समाजाच्या युवा विभागाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे वडिल स्वातंत्र्य सैनिक होते.
रविंद्र वेळीप या 28 वर्षीय युवकाने बेकायदा खाणविरोधी चळवळीत सक्रिय भाग घेतला आहे. अनुसूचित जमातींना वनविषयक हक्क मिळावेत म्हणूनही त्याने कायम संघर्ष केला. 53 वर्षीय एल्वीस हे बीएस्सी, एलएलबी शिक्षित आहेत. कुंकळ्ळी युनियन क्लबचे ते अध्यक्ष आहेत. गोवा नागरी सेवेचा ते राजीनामा देऊन आलेले आहेत.
आत्तापर्यंत आपने एकूण पंधरा उमेदवार जाहीर केले असून त्यात दोन महिला आहेत. आमचे उमेदवार हे निवडणुकीर्पयत सार्वजनिक छाननीसाठी खुले आहेत. ते कोणत्याही गैरकृत्यात गुंतले असतील तर कुणीही दाखवून द्यावे. अजून तरी आमच्या उमेदवारांविषयी कसलीच तक्रार आलेली नाही, असे वाल्मिकी नायक यांनी सांगितले.