पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यात भाजपला आम आदमी पक्ष मदतरूप व लाभदायी ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील बंडाचा परिणाम भाजपवर येत्या निवडणुकीवेळी होणार नाही, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. येथे पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले की, गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच ‘आप’चे उमेदवार असतील. आम आदमी पक्षाने जर भाजपची दोन मते फोडली, तर त्याचवेळी तो पक्ष काँग्रेसची आठ मते फोडेल. आमचे नुकसान खूप कमी होईल. ‘आप’मुळे काँग्रेसचीच हानी जास्त होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा शाखेत अलीकडे जे बंड झाले, त्याचा परिणाम निवडणुकीवेळी संभवत नाही; कारण संघाचे स्वयंसेवक हे संघटनानिष्ठ असतात व आहेत. ते व्यक्तीच्या मागे राहत नाहीत. ते संघटनेसोबत राहतात. यापूर्वीचा देशातील इतिहास सर्वांना ठाऊक आहे. गोव्यात ज्यांनी बंड केले, त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे; कारण त्यांचे सामाजिक क्षेत्रात व संघाच्या वाढीत योगदान आहे. सध्याचा प्रश्न हा परिवारातील प्रश्न आहे व त्यावर आम्ही चर्चेद्वारे तोडगा काढू. गडकरी म्हणाले की, काँग्रेसमधील नेते एकमेकांशी भांडत आहेत. तेच काँग्रेसमुक्त गोवा करण्याचे काम करतील. आमचा म.गो. पक्षाशी जागा वाटपाबाबत वाद नाही. युती होणारच. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे जागा वाटपाविषयी म.गो.शी चर्चा करतील. (खास प्रतिनिधी)
‘आप’चा भाजपला लाभ!
By admin | Published: September 24, 2016 2:37 AM