पणजी: पर्यावरणाची हानी करणारा मरीना प्रकल्प नावशी गावात नको. या प्रकल्पाविरोधात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तो रद्द करावा अशी मागणी केली जाईल. प्रकल्प रद्द न झाल्यास प्रखर आंदोलन करु असा इशारा सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी दिला आहे.
या मरीना प्रकल्पाला विराेध करावा असे निवेदन आपण ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांना सादर केले आहे. या प्रकल्पाच्या १३ गावांवर परिणाम होणार असल्याने हे गाव ज्या मतदारसंघात आहेत, त्या आमदारांना आपण निवेदने देणार असून त्यांनी त्याची दखल घ्यावी. केवळ सत्ताधारी पक्षात आहे, म्हणून सरकारच्या बाजूंनी त्यांनी बोलू नये अशी टीकाही त्यांनी केली.
बोरकर म्हणाले, की मरीना प्रकल्पामुळे पर्याहरणाची जी हानी होणार आहे, त्याची कल्पना काही गावांना नाही. त्यामुळे या गावांमध्ये जाऊन जागृती केली जाईल. मरीना प्रकल्प म्हणजे नक्की काय, तेथे किती बोटी असणार, कोणत्या सुविधा असतील याचा काही पत्ता नाही.या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांची बाजू ऐकून घेणे तसेच त्यांना सादरीकरण सादर करणे अपेक्षित होते. मात्र सरकार तसेच संबंधीत कंपनीने ते केले नाही. थेट प्रकल्प होणार असे जाहीर केले अशी टीका त्यांनी केली.