किशोर कुबल, पणजी : लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोनिंग प्लॅन तयार केला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पेडणेतील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले. नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत.
माजी आमदार परशुराम कोटकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झोन प्लॅन रद्दच केला जावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला असे सांगितले की,‘ सरकार पेडणेवासीयांच्या विरोधात मुळीच नाही. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय झोन प्लॅन तयार केला जाणार नाही. शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात महिलांचाही समावेश होता. सध्या सरकारने झोन प्लॅन स्थगीत ठेवला आहे. तो पुन्हा खुला केला जाऊ शकतो, अशी भीती लोकांमध्ये आहे. अनेक घरे असलेल्या जमिनीही ‘सेटलमेंट झोन ’ दाखवलेला नाही.नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांना सरपंच, पंच सदस्य वगैरे भेटले परंतु त्यावेळी त्यांनी पंचायतींमधील लोकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप करण्यात आला.