पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपस्थित नसले तरी, सर्व मंत्र्यांनी मिळून पर्वरी येथील मंत्रलयात गुरुवारी बैठक घेतली व आपण संघटीत आहोत असे दाखवून दिले. सरकार स्थिर असून सत्ताधाऱ्यांच्याबाजूने तरी कोणताच भूकंप होणार नाही, असे मंत्री विजय सरदेसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
मुख्यमंत्री दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री नसले तरी, प्रशासन चालायला हवे असे वाटल्याने मंत्र्यांनी एकत्र येत बैठक घेतली. नवे मंत्री मिलिंद नाईक व निलेश काब्राल यांनीही बैठकीत भाग घेतला. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीचा प्रशासनावर निश्चितच परिणाम झालेला आहे. पण आम्हाला गेल्या अर्थसंकल्पातून सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूतर्ता करायची आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आर्थिक वर्षातील सहा महिने निघून गेले. आता यापुढे कोणती कामे करायची आहेत याचा आढावा आम्ही घेतला आहे. ही मंत्रिमंडळाची बैठक नव्हे. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीला अध्यक्ष असावा लागतो. आमची बैठक ही फेरआढावा बैठक होती, असे मंत्री सरदेसाई म्हणाले.
येत्या फेब्रुवारीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत आहे. तत्पूर्वी अर्थसंकल्पात घोषित केलेली कामे आम्हाला करून घ्यायची आहे, असे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. आम्ही आमचा प्राधान्यक्रम ठरवत आहोत. प्रत्येक बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आम्ही अशा प्रकारे बैठक घेऊ व प्रशासनाला वेग देऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. सरकार स्थिर आहे असाही संदेश आम्ही देत आहोत, असे मंत्री सरदेसाई म्हणाले. भूकंप होऊ शकतो, असे रमाकांत खलप यांनी म्हटलेले आहे. येथे सत्ताधाऱ्यांमध्ये भूकंप वगैरे होणार नाही, झालाच तर तो काँग्रेसच्याबाजूने होईल, असा टोला सरदेसाई यांनी लगावला. मुख्यमंत्री पर्रीकर हे उपचार घेत असून ते आजारातून बरे होऊन परत येतील, असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. प्रत्येक मंत्री स्वत:चे काम करत आहे. मुख्यमंत्री आजारी आहेत म्हणून काम थांबलेले नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, मंत्री विनोद पालयेकर, गोविंद गावडे व बाबू आजगावकर हे गोव्याबाहेर असल्याने बैठकीला पोहचू शकले नाहीत. पालयेकर हे विदेशात तर आजगावकर हे दिल्लीला असल्याचे कळते.