पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला पण इफ्फीमध्ये अजून चैतन्याचा अभाव आहे, असा अनुभव मंगळवारी म्हणजे इफ्फीच्या दुस-या दिवशी आला.
फिल्म बाजाराला काल मंगळवारी आरंभ झाला. मेरियट हॉटेलमध्ये एनएफडीसीने आयोजित केलेल्या फिल्म बाजाराला अजून मोठासा प्रतिसाद मिळालेला नाही. यापुढे प्रतिसाद मिळेलही पण सध्या आयोजनातील त्रुटी पाहुण्यांना तापदायक ठरत आहेत. फिल्म बाजारसाठी मिडियामधील मंडळी व अन्य प्रतिनिधींना एकूण दोनवेळा नोंदणी करावी लागते. प्रथम मेरियट हॉटेलमधील फिल्म बाजारच्या काऊन्टरकडे जाऊन प्रतिनिधींना अर्ज भरावा लागतो. तिथे नोंदणी झाल्यानंतर मग हॉटेलमध्ये फिल्म बाजारचा स्वतंत्र नोंदणी विभाग आहे. तिथे जाऊन स्वत:चा फोटो काढून घ्यावा लागतो. तिथे मग फिल्म बाजारचे स्वतंत्र कार्ड दिले जाते. मात्र तुम्ही प्रथम जो अर्ज भरून दिलेला असतो तो अर्ज या दुस-या नोंदणी कक्षात येईर्पयत प्रतिनिधींना प्रतीक्षा करत रहावे लागते. ही सगळी प्रक्रिया कंटाळवाणी झालेली आहे, अशा प्रतिक्रिया मंगळवारी ऐकायला मिळाल्या.
इफ्फीस्थळी प्रतिनिधींची संख्या ही गेल्यावर्षी जेवढी होती, तेवढीच आहे. चित्रपट चांगले दाखविले जाऊ लागले आहेत व त्याचा लाभ सिनेरसिक घेत आहेत. मात्र बॉलिवूडमधील तसेच दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील नावाजलेले तारे- तारका येण्यास अजून आरंभ झालेला नाही. उद्घाटन सोहळ्य़ावेळी शाहरुख खान, श्रीदेवी, शाहीद कपुर यांनी शोभा वाढवली. मात्र दुस-या दिवशी इफ्फीमध्ये चैतन्य जाणवले नाही. कला अकादमी, आयनॉक्स परिसर, कांपाल अशा ठिकाणी इफ्फीचा माहोल असला तरी, त्यात अजून जान आलेली नाही. अर्थात मंगळवारी इफ्फीचा केवळ दुसराच दिवस पार पडला आहे. येत्या तीन दिवसांत वातावरण बदलेल, अनेक वलयांकित अभिनेते, अभिनेत्री येतील व त्यामुळे वातावरणात जान निर्माण होईल, असे प्रतिनिधींना वाटते. इफ्फीस्थळी खवय्यांचीही गर्दी पहायला मिळते.
नामांकित निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई हे मंगळवारी सायंकाळी इफ्फीस्थळी दाखल झाले. यामुळे काही सिनेरसिकांचा हुरूप वाढला. अन्यथा दिवसभर इफ्फीस्थळी काहीशी उदासिनताच होती.
गोवा फिल्म फ्रेटर्निटी फेडरेशनने मंगळवारी एक पत्रक प्रसिद्धीला दिले असून गोवा मनोरंजन संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांच्यावर फेडरेशनने टीका केली आहे. श्रीवास्तव यांना इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्य़ावेळी महनीय व्यक्तींच्या कक्षात बसण्याचे निमंत्रण कुणी व कुठल्या निकषांवर दिले याचे स्पष्टीकरण आयोजकांनी द्यावे, असे फेडरेशनचे प्रवक्ते ओगी डिमेलो यांनी म्हटले आहे.
इफ्फीत स्थानिक निर्मात्यांचे चित्रपट दाखविण्यासाठी खास विभाग सुरू केल्याचे सांगून गोवा मनोरंजन संस्थेने स्थानिक चित्रपट निर्मात्यांची दिशाभुल केली असून सदर विभाग महोत्सवाचा अधिकृत विभाग नसल्याने सदर विभागात प्रदर्शित होणा:या चित्रपटाच्या निर्मात्यांना व कलाकारांना सरकारच्या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नसल्याचे डिमेलो यांनी म्हटले आहे.