पणजी - एकीकडे देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात सुरु असताना दुसरीकडे मात्र गोव्यात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची बदनामी करणारं लिखाण केल्याचं उघड झालं आहे. गोव्याच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर अवमान करणारे लिखाण असल्याचे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत.
गोवा शासनाच्या इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक पुरवणी 'गोव्याचा इतिहास' नावाने जोडण्यात आली आहे. त्यात गोव्यातील बार्देश तालुक्यात छत्रपती शिवरायांनी आक्रमण करुन सलग तीन दिवस गावे लुटली, जाळपोळ केली, लहान मुले आणि महिलांना डांबून ठेवले तसेच काहींना ठार मारले असं छापण्यात आलं आहे. मात्र हे धादांत खोटे असून छत्रपती शिवरायांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे. परस्त्रीला मातेसमान वागणूक देणाऱ्या राजांनी शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मानपूर्वक परत पाठवलं होतं. त्यामुळे शिवरायांच्या चरित्रावर चिखलफेक करणे हा मोठा अपराध आहे. त्यामुळे संबंधित लेखक आणि पाठ्यपुस्तकात हा धडा समावेश करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांना निवेदन देण्यात आलं आहे. महाराजांबद्दल संतापजनक लिखाण करण्यात आलं असून राजांविषयी खोटा इतिहास कोणीही सहन करणार नाही. हे पुस्तक राज्य शासनाने त्वरीत मागे घ्यावं अन्यथा शिवप्रेमी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील असा इशारा गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दिला आहे.तसेच हे पहिल्यांदाच होत नसून २००८ मध्ये देखील अशाच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात छत्रपतींची बदनामी करण्यात आली होती. त्याविरोधात आंदोलन केल्यानंतर शासनाने ते पुस्तक मागे घेतले होते. शासनाने आताही या पुस्तकाची पुरवणी मागे घेतली नाही तर पुन्हा त्या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल असंही मनोज सोलंकी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, शिक्षण संचालकांनी हा विषय गंभीर आहे, येत्या अभ्यासक्रमात हा भाग त्वरीत वगळू, तसेच अन्य कोणत्याही पाठ्यक्रमात असे काही आढळल्यास आम्हाला त्वरीत कळवा, त्यावरही कारवाई करु असं आश्वासन वंदना राव यांनी दिलं आहे.