पणजी : मंगळवारी शहरातील बसस्थानकासमोरील सर्कलवर एका वाहनाने १६ दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातास बेशिस्त पार्किंगही जबाबदार असल्याचे आढळून आले. क्रांती सर्कलजवळ वाहतूक वळविण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स घातलेले आहेत. या बॅरिकेड्सजवळ रस्त्यावरच काही लोक दुचाक्या व अन्य वाहने पार्क करीत असतात. काहीजण बॅरिकेड्स हटवून वाट मोकळी करतात आणि वाहने दामटतात, तर काही वाहनधारक एकेरी मार्ग असूनही विरुध्द दिशेने येतात. वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांना विचारले असता त्यांनीही बेशिस्त पार्किंगबद्दल पाढा वाचला. या ठिकाणी पोलीस नेमूनही काही उपयोग नाही; कारण जरा नजर हटली तरी कोणीतरी येतो आणि वाहन पार्क करून जातो. वाहनधारकांनी स्वत:च शिस्त लावून घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुलावर कार बंद पडल्याने मेगा ब्लॉक दरम्यान, नव्या मांडवी पुलावर बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास कार बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सुमारे तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरात ठिकठिकाणी वाहने तुंबली तसेच पुलावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. ही कार हटविण्यासाठी पोलिसांनी क्रेन पाठवली; परंतु तिही पुलावर बंद पडल्याने वाहतुकीचा आणखी फज्जा झाला. परिस्थिती हाताळण्यास वाहतूक पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले. कामावरून सुटून घरी परतणाऱ्या नोकरदारांचा खोळंबा झाल्याने पोलिसांच्या नावाने त्यांनी बोटे मोडली. (प्रतिनिधी)
बेशिस्त पार्किंगमुळेही अपघात
By admin | Published: March 05, 2015 1:32 AM