मडगाव - कामाच्या पहिल्याच दिवशी एका पंचवीस वर्षीय युवकाला अपघाती मृत्यूने गाठण्याची दुदैवी घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील सासष्टी तालुक्यात घडली. रोहित रेडकर असे या दुदैवी युवकाचे नाव आहे. तो काणकोण तालुक्यातील आगोंद येथील आहे. झोमेटोमध्ये तो डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता. जनरेटर घेउन जाणाऱ्या एका वाहनाने त्याला धडक दिली हाेती. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला पणजी येथील गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले हाेते. रविवारी रात्रीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राेहितला धडक दिल्यानंतर त्या वाहनाने एका फार्मसीलाही धडक दिली होती. सुदैवाने रविवारी असल्याने ती फार्मसी बंद होती. अन्यथा अर्नथ घडला असता. या अपघातात जबाबदार त्या वाहनाचा चालक निर्मल कुल्लू हाही जखमी झाला असून, त्याच्यावर येथील मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा स्तरीय इस्पितळात उपचार सुरु आहे. त्याची रक्त चाचणीही घेतली आहे. त्याचा अहवाल अजूनही येणे बाकी आहे. वाहन चालविताना तो दारुच्या नशेत होता की नाही हे वैदयकीय अहवालांनतर स्पष्ट होणार आहे. येथील कोलवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला होता. तेथील पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलिस तपास चालू आहे.