पणजी : उसाच्या रसाचा गाडा चालवून रोजी रोटी चालविणारा आमोणे येथील रतन करोल याच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेला दत्तगुरू सिनारी याची साडेसात वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जामीनवर सुटका केली.
डिसेंबर २०१५ मध्ये रतन करोल याचा खून करून त्याचे बारीक तुकडे करून ते पिशवीत भरून उसगाव येथे टाकण्यात आले होते. पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न होता, परंतु हे प्रकरण डिचोली पोलिसांकडून काढून क्राईम ब्रँचला सोपविण्यात आले आणि इथेच या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळाला. तपास कामाचा झंजावात यावा तसे सर्व पर्याय खुले ठेऊन तपास चालू ठेवण्यात आला होता. शेवटी या प्रकरणाचा छडा लावण्यास क्राईम ब्रँचला यश मिळाले. दत्तगुरू सिनारी आणि गोवा पोलिसांच्या सशस्त्र दलात असलेला त्याचा बंधू देविदास सिनारी या दोघांनाही करोलच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली. करोलने सिनारीला उलट उत्तर दिले या रागानेच करोलचा त्याने काटा काढला.
या प्रकरणातील तपास करताना क्राईम ब्रँचची प्रतीष्ठाही पणाला लागली होती. मयत करोल यांची पत्नी या प्रकरणातील एक महत्त्वाची साक्षीदार आहे. त्यावेळी ती गरोदरही होती. अशा परिस्थितीत तिच्यावर संशयितांकडून दबाव येण्याची भिती होती. ही जोखीम लक्षात घेऊन क्राईम ब्रँचने तिची व्यवस्था एका स्वयंसेवी नर्सींगहोममध्ये केली होती. त्या ठिकाणी तिची जेवणाखाणाच्या व्यवस्थेपासून इतर सर्व प्रकारच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात येत होती.
भावाची आत्महत्त्या
या प्रकरणातील दुसरा संशयित असलेला दत्तगुरूचा धाकटा बंधु देविदास सिनारी याने तुरुंगातच गळफास लावून आत्महत्त्या केली होती. इतके होऊनही मुख्य संशयित असलेल्या त्याच्या थोरल्या भावाला पश्चाताप झाला नाही. त्याने खून पचविण्यासाठी धडपड चालू केली. परंतु ती व्यर्थ गेली.
सुतावरून स्वर्ग
तपास अधिकारी दत्तगुरू सावंत यांना सिनारी याच्या कारमध्ये रक्ताचा एक डाग आढळला. हा डागच या प्रकरणातील तपासाला अचूक दिशा देणारा ठरला. तो डाग करोल याच्याच रक्ताचा असल्याचे नंतर वैद्यकीय तपासणीतून आढळून आले.