पणजी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेत्रदीपक यश मिळविलेल्या गोव्यातील मुलींचे भरभरून कौतुक केले. गोवा विद्यापीठाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के या मुली होत्या. तसेच ५५ टक्के पदवीधारकही मुलीच होत्या.
राजभवनावर दरबार सभागृहात आयोजित केलेल्या गोवा विद्यापीठाच्या ३४ व्या पदवीदान सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या मुर्मू यांनी गोवा विद्यापीठाच्या कार्याचा गौरव केला. तसेच विद्यापीठात यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यात मुलींची संख्या अधिक प्रमाणावर असल्यामुळे आपल्याला खूप आनंद होत असल्याचेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात व्यासपीठावर राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन उपस्थित होते. गोवा विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांचा उल्लेख करून राष्ट्रपतींनी कौतुक केले. कोंकणी विभागाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
माझे मुल्यमापन करताना माझ्या यशाचे मोजमाप करू नका तर कितीवेळा मी अपयशी ठरलो आणि ते अपयश पचवून पुन्हा पुढे सरसावलो या गोष्टीवर करा’ या दक्षीण आफ्रिकेचे स्वातंत्र्य सेनानी, नोबल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांच्या वाक्याचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थ्यांनाही नेमकी हीच वृत्ती अंगी बाळगण्याचा संदेश दिला. राष्ट्रपती मुर्मू यांनी २० विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका आणि पदके बहाल केली.
राज्यपाल पी एस श्रीधर पिल्ले यांनी यावेळी आपल्या भाषणातून ‘राष्ट्र प्रथम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचा उल्लेख केला. ते म्हणाले की राष्ट्र प्रथम आणि राजकारण, धर्म आणि इतर गोष्टी या नंतर, हे तत्व अंगिकारले तरच आपण अंतीम उद्धीष्ठ गाठू शकाल असे सांगितले.