लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकांची सरकारबद्दल काय भावना आहे, हे जाणून घ्या व त्यानुसार वागा. त्यासाठी सर्वेक्षण करावे लागेल. आपले कुठे काय चुकते हेही कळून येईल आणि त्यानुसार सुधारणा करता येतील, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
ताळगाव येथील कम्युनिटी हॉलमध्ये काल, शुक्रवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मंत्रिमंडळातील इतर मंत्री, आमदार, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, तुम्ही जे काही चांगले अथवा वाईट करता त्याची संपूर्ण माहिती तुमच्या मतदारांकडे असते. राजकारण्यांचे खरे तर हे परफॉर्मन्स ऑडिटच असते. पुढील दोन वर्षात चांगले काम करा, त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येईल. समस्यांमधून संधी निर्माण करणारे आणि संधीमधून समस्या निर्माण करणारे अशा दोन्ही प्रकारचे लोक असतात, यापैकी तुम्ही स्वतःला कोण बनायचे आहे, हे ठरवा. यशामध्ये सुख टिकवणे कठीण असते. आज आम्ही सुखात आहोत परंतु त्याचबरोबर भविष्यातील उद्दिष्ट लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागायला हवे. फायनान्शियल ऑडिटपेक्षा पर्फोर्मन्स ऑडिट महत्त्वाचे आहे. आत्मपरीक्षण करा. राजकारणात लोक हुशार असतात, असा सल्लाही गडकरींनी दिला.
बैठकीत ठराव संमत
यावेळी बैठकीत नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास'वर त्यांनी दिलेला भर देशाला एकत्र आणून नवीन भारताचा भक्कम पाया घातला, असे ठरावात म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध, सर्वसमावेशक आणि स्वावलंबी गोव्याच्या संकल्पनेला पाठिंबा देणारा ठराव घेण्यात आला.
एसटींना राजकीय आरक्षण
एसटींना राजकीय आरक्षणाबाबतचा महत्त्वाचा ठराव भाजप राज्य कार्यकारिणीने घेतला आहे. केंद्र सरकारकडे याबाबतीत प्रभावीपणे पाठपुरावा करुन राज्य सरकारने एकदाचा हा विषय धसास लावावा, अशी मागणी या ठरावाव्दारे सरकारकडे करण्यात आली आहे.