पणजी - आपण केवळ बोलूनच दाखवत नाही तर कृतीही करत असतो. आपण किनारपट्टीतील ड्रग्ज व्यवसायिकांची नावे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादर केली होती. त्यानंतर त्या व्यवसायिकांविरुद्ध कारवाईही झाली. तीन वर्षासाठी अनेकजण तुरुंगातही गेले, असे कळंगुटचे आमदार तथा बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मंगळवारी (23 जुलै) विधानसभेत सांगितले आहे.
माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांना आम्ही ड्रग्ज व्यवसायाशीनिगडीत काही घटकांबाबत माहिती दिली होती. आम्ही गोपनीय अहवालच सादर केला होता. पोलिसांनी त्याविरुद्ध कारवाई केली काय अशी विचारणा प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केली होती. आपण पोलिसांकडून माहिती घेतो व तुम्हाला सांगतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. तसेच तुम्ही अजुनही आपल्याला माहिती सादर करा, कारवाई होईल, असे सावंत यांनी खंवटे यांना सांगितले.
लोबो यांनी आमदारपदी असताना किनारपट्टीत ड्रग्ज माफिया आहेत असे म्हटले होते. किनारपट्टीतील कोणते घटक ड्रग्ज व्यवसायात आहेत याची आपल्याला कल्पना आहे, असे लोबो त्यावेळी म्हणत होते व पोलिसांवर टीकाही करत होते, अशी आठवण खंवटे यांनी करून दिली. यामुळे मंत्री लोबो उभे राहिले. होय, आपण त्यावेळी सगळी माहिती पर्रीकर यांना दिली होती व पोलिसांनी कारवाई करत त्या घटकांना गजाआडही केले. मी केवळ बोलून गप्प बसलो नाही. राज्यात अनेकजण बोलतात व शांत होतात. मी बोलल्यानंतर सविस्तर नावांसह सगळी माहिती पर्रीकर यांना दिली. त्यामुळेच ड्रग्ज प्रकरणी काहीजण तीन वर्षासाठी तुरुंगात गेले, असे लोबो यांनी स्पष्ट केले.
विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतूक पोलीस ठेवू - मुख्यमंत्रीराज्यातील विद्यालयाजवळील जंक्शनवर वाहतुकीची कोंडी होत असेल तर सकाळी व सायंकाळच्यावेळी व दुपारीही वाहतूक पोलीस ठेवण्याची व्यवस्था सरकार करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी (23 जुलै) विधानसभेत जाहीर केले आहे. काँग्रेसचे नावेली मतदारसंघाचे आमदार लुइझिन फालेरो यांनी मूळ प्रश्न मांडला होता. नावेली येथे हायस्कुल, हायरसेकंडरी, कॉलेज असलेल्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी आपण वाहतूक सिग्नलची व्यवस्था केली होती. महामार्ग रुंदीकरणावेळी ते सिग्नल काढून टाकले गेले. तिथे आता वाहतुकीची प्रचंड कोंडी होते, असे फालेरो यांनी सांगितले. बांधकाम खात्याकडे अनेकदा पत्र व्यवहार केला तरी प्रश्न सुटला नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी मला चारवेळा प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही दिले होते, असे फालेरो यांनी सांगितले आहे. सिग्नल होईल तेव्हा होईलच पण अगोदर त्या हायस्कुलकडे वाहतूक पोलिसाची सोय करावी, अशीही मागणी फालेरो यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली. वार्का येथेही अशाच प्रकारे वाहतूक कोंडी होते व तिथेही वाहतूक पोलीस असायला हवा, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव म्हणाले. राज्यात ज्या ज्या ठिकाणी विद्यालये आहेत व जंक्शनमुळे वाहतूक कोंडी होते, तिथे वाहतूक पोलीस नियुक्त केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.