पणजी - निपाणी नगरपालिका नगराध्यक्षांच्या शासकीय मोटारीला येथील कॅसिनो जेटीनजीक बेकायदा पार्किंग प्रकरणी पणजी मनपा आणि पोलिसांनी गुरुवारी रात्री संयुक्त कारवाईत क्लॅम्प ठोकले.
कॅसिनोंमध्ये जुगार खेळण्यासाठी येणारे पर्यटक येथिल जेटींच्या आवारात 'नो पार्किंग'च्या ठिकाणी वाहने पार्क करून कॅसिनोंमध्ये जातात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात तसेच शहरात राहणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. लॉकडाऊनमुळे तब्बल सात महिने बंद राहिलेले कॅसिनो अलीकडेच पुन्हा सुरू झालेले आहेत. त्यानंतर शहरात बेकायदा पार्किंगचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेकडे यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. रात्रीच्या वेळी कॅसिनोंमध्ये जुगार खेळण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. ते अस्ताव्यस्त वाहने पार्क करतात.
महापौर उदय मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता निपाणीच्या नगराध्यक्षांची मोटार बेकायदा पार्क केलेली आढळली त्यामुळे कारवाई केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की, दंडाची १०० रुपये भरल्यानंतरच क्लॅम्प काढण्यात आले. दंडाची ही रक्कम आजपासून ५०० रुपये करण्यात येत असल्याची माहितीही महापौरांनी दिली.
कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे. बुधवारी रात्री ५४ दुचाकी जप्त करण्यात आल्या तसेच १७ चारचाकींना बेकायदा पार्किंग प्रकरणी क्लॅम्प ठोकण्यात आले. एकूण २८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती महापौरांनी दिली. नो पार्किंग'मध्ये वाहने ठेवणाऱ्यांवर दंडाची कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे, असे महापौरांनी सांगितले.