पणजी : गोव्यात येणारे बरेच पर्यटक उघड्यावर कुठेही स्वयंपाक करतात. शिवाय तिथेच कचराही टाकून जातात. सरकार येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सरकारी यंत्रणा कारवाई सुरू करील असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारी विधानसभेत जाहीर केले. गोवा विधानसभेत विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी शून्य प्रहरावेळी पर्यटकांविषयीचा मुद्दा उपस्थित केला. आम्हाला गोव्यात अधिकाधिक पर्यटक आलेले हवे आहेत पण उघड्यावर पर्यटक स्वयंपाक करून सगळी घाण करतात. यामुळे गोव्याची प्रतिमा खराब होते असे कवळेकर म्हणाले. पर्यटक गोव्याचा निरोप घेताना मग उघड्यावरच स्वयंपाक टाकतात असे ते म्हणाले. उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आपण अशा पर्यटकांचा विषय गंभीरपणे घेतला आहे. आपल्याकडे त्याविषयी तक्रारी येत आहेत. मिरामार व अन्य भागांत पर्यटक उघड्यावर स्वयंपाक करतात. त्यामुळे मलाही त्रास होतो. सरकार जानेवारीत कारवाई पथके स्थापन करील. त्यासाठी 2001 सालच्या कायद्यात दुरूस्ती करून पर्यटकांचा असा त्रास म्हणजे मोठा उपद्रव म्हणून कायदेशीररीत्या जाहीर केले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की गोव्याला जरी श्रीमंत पर्यटक जास्त यावे असे वाटत असले तरी देखील कमी बजेट असलेले काही पर्यटक कायम या राज्यात येतील. बसगाड्या घेऊन हे पर्यटक येतात. ते अग्रशाळा किंवा मंदिरात राहतात. अशा पर्यटकांना स्वयंपाक करू देण्यासाठी ठराविक जागा सरकार निश्चित करील. तिथे शौचालय सुविधाही पुरविली जाईल. थोडे शूल्क पर्यटकांकडून आकारले जाईल. मात्र या जागा वगळता इतरत्र जे स्वयंपाक करतील किंवा कचरा टाकतील त्यांच्याविरुद्ध खास पथके कारवाई करतील. दरम्यान गोव्यात चोर्यांचे प्रमाण 4.8 टक्क्यांनी वाढले आहे अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यानी अन्य एका विषयाच्या अनुषंगाने दिली. पोलिसांना 46 नवी वाहने दिली जातील. गोव्यात बंदोबस्त वाढविला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात उघड्यावर स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांविरूद्ध जानेवारीपासून कारवाई : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 3:51 PM