म्हापसा: आपले वाहन आपण चुकीच्या जागी लावले नाही ना याची काळजी प्रत्येक पर्यटकाला घेणे आता भाग पडणार आहे. कळंगुट येथील प्रसिद्ध किनारपट्टीत येणा-या पर्यटकांनी आपले वाहन चुकीच्या जागी लावल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. तशी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हंगामा सुरू झाल्यानंतर येणा-या वाहनांची सततची रिघ या परिसरात लागलेली असते. शेजारील राज्यातून येणारे बहुतेक पर्यटक आपल्या सोयीसाठी स्वत:चे वाहन घेऊन येत असतात. वाहने पार्क करण्यासाठी असलेल्या जागेत ते पार्क न करता जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी पार्क करून निघून जातात. त्यातून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे हंगामा सुरू होण्यापूर्वी पर्यटकांना पार्किंगची शिस्त लागावी यासाठी चुकीच्या जागी वाहने पार्क करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यास कळंगुट वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे.
बेशिस्तपणाच्या पार्किंगमुळे त्याचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. परिसरात राहणा-या लोकांच्या घरासमोर वाहने पार्क केली जातात. तसेच फुटपाथवरसुद्धा वाहने पार्क केली जात असल्याने लोकांना धोकादायकपणे रस्त्यावरून चालत जाणे भाग पडते. या सर्व प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी कळंगुट येथील वाहतूक पोलिसांना विशेष अशी गाडी देण्यात वाहन देण्यात आली आहे. या गाडीचा वापर वाहनावर कारवाई करण्यासाठी केला जाईल. चुकीच्या जागी पार्क केलेल्या दुचाकी उचलून नेण्यात येईल तर चारचाकी गाड्यांना टाळे लावण्यात येणार आहे. कारवाई केलेल्या वाहन चालकांना नंतर वाहतूक पोलिसांत योग्य तो दंड जमा करून वाहनाची सुटका करून घ्यावी लागणार आहे.
कांदोळी पंचायतीचे सरपंच ब्लेझ मिनेझिस यांनी दिलेल्या माहितीनुसार बेशिस्त पार्किंगचे परिणाम लोकांना भोगावे लागत असतात. लोक रस्त्यावरून चालत जात असल्याने भरधान वेगाने जाणा-या वाहनांमुळे अनेक अपघात सुद्धा घडले आहेत. परिसरातील लोकांच्या सुद्धा या संदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती मिनेझिस यांनी दिली. सदर वाहनाचे उद्घाटन आमदार उपसभापती मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आले.