वास्को - सिगारेट व तंबाखू सेवनामुळे आरोग्याची हानी तर होतेच पण सार्वजनिक स्थळी इतरांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. वास्को (गोवा) पोलीस स्थानकाच्या हद्दीत धूम्रपान आणि सार्वजनिक स्थळी होणारे पेयपान याविरुद्ध जोरदार मोहीम चालवणारे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांचा आता अनेकांनी धसका घेतला आहे. लोकांचे हे व्यसन सुटावे यासाठीच आपण कडक मोहीम अवलंबल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वास्कोत सार्वजनिक चालणारी धूम्रपानाची सवय त्यांनी मोडूनच काढली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये रुजू झालेल्या रापोझ यांनी २०१८ सालात असे प्रकार करणाऱ्या तब्बल ६१०० लोकांवर दंडात्मक कारवाई करून वचक बसवला आहे. ते या मोहिमेपुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर सार्वजनिक स्थळावर दारू पिणाऱ्या, लघुशंका करणाऱ्या, अतिक्रमण करणाऱ्या २७५५ लोकांवरही कारवाई झाली आहे. अशा प्रकारांवर कारवाई करणारे वास्को पोलीस स्थानक हे गोव्यात पहिल्या स्थानावर आहे. यावरून रापोझ यांची धडाडी दिसून येते. या कारवाईतून सरकारी तिजोरीत १३ लाख ५१ हजार रुपये जमा झाले आहेत.
रापोझ म्हणाले की गोव्यात कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्याचे प्रमुख कारण धूम्रपान आणि तंबाखू सेवन हे आहे. आपण वास्कोत सुरू केलेल्या कारवाईला यश येत असून आता ९९ टक्के प्रकार आटोक्यात आले आहेत. किमान काही लोकांनी या कारवाईच्या भीतीने तंबाखू सेवन किंवा धूम्रपान सोडल्यास ते माझ्या मोहिमेचे यश ठरेल असे ते म्हणाले.
कारवाई सुरू केली तेव्हा युवकांचे पालक पोलीस स्थानकात येऊन कशाला ही कारवाई करता असे विचारत. मात्र आता अनेक तरुण या कारवाईमुळे लवकर घरी जाऊ लागले आहेत. वास्कोत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा पेयपान करताना लोक आता दहादा विचार करतात हे त्यांच्या मोहिमेचे नक्कीच यश आहे.