लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांत उघडकीस आलेल्या नोकरी विक्री प्रकरणात आतापर्यंत १८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. दरम्यान, नोकरीसाठी पैसे दिल्याच्या प्रकरणात सोमवारी अटक केलेल्या संशयित शिक्षक योगेश शेणवी-कुंकळीकर याच्याकडून नोकरीच्या बहाण्याने दोन कोटी वीस लाख रुपये घेतलेल्या श्रुती प्रभू ऊर्फ प्रभुगावकर हिला मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. नोकऱ्या विक्री प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी, या प्रकरणातून कोणीही सुटणार नाही, सर्वांवर कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
'नोकऱ्या विक्री प्रकरणी धडक कारवाई चालू आहे. आतापर्यंत १८ जणांवर कारवाई झाली असून, यात पाच-सहा महिलांचाही समावेश आहे. कोणीही सुटणार नाही. अधिकारी असतील तर त्यांनाही अटक होईल. काहीजणांच्या नोकऱ्याही जातील. ठकसेनांच्या मालमत्ता जप्त करून फसवणूक झाली, त्यांचे पैसे परत मिळवून दिले जातील', असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
एका कार्यक्रमावेळी पत्रकारांनी त्यांना गाजत असलेल्या नोकरी विक्री भ्रष्टाचार प्रकरण तसेच यात भाजपशी संबंधित काहीजण सापडल्याने त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'नोकऱ्या देण्याच्या आमिषाने ज्या लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे, त्या सर्वांनी पुढे येऊन त्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून सर्व आरोपींना तुरुंगात टाकता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'या ठकसेनांना तुरुंगात पाठवून आम्ही त्यांची मालमत्ता जप्त करू आणि ज्यांच्याकडून त्यांनी नोकऱ्यांसाठी पैसे घेतले ते त्यांना परत करू, या घोटाळ्यांसंदर्भात गोवा पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश मी याआधीच दिले आहेत.'
पोलिसांचे चोख काम
मुख्यमंत्री म्हणाले की, 'नोकरी विक्री प्रकरणाच्या तपासाचे काम पोलिस चोख बजावत आहेत. आणि त्यामुळेच आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला किंवा तिला अटक केली जात आहे. राज्यात भाजपचे पाच लाख सदस्य असून, प्रत्येकजण काय करतो यावर मी नजर ठेवू शकत नाही. या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.
५.२० लाखांची फसवणूक : संशयितास अटक
नोकरी विक्रीचे लोण आता तिसवाडीत अधिकच फैलावल्याचे आढळून आले आहे. सादिक अहमद या भाटले- पणजी येथे राहणाऱ्या संशयिताने झरीन बानू या महिलेची ५.२० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित सादिक अहमदने झरीन बानू हिला लेखा खात्यात नोकरी देतो असे सांगून २.२० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे आढळून आले. तसेच हाऊसिंग बोर्डमध्ये प्लॉट मिळवून देतो असे सांगून तिच्याकडून ३.२० लाख रुपये हडप केले. संशयिताने एकूण ५.३० लाख रुपये घेतले आहेत अशी तक्रार या महिलेने पणजी पोलिस स्थानकात केली. पणजी पोलिसांनी संशयित सादिक अहमदला अटक केली आहे. तो भाटले येथे धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहतो. नोकरी विक्री फसवणुकीचे आतापर्यंत चार पोलिस स्थानकांत गुन्हे दाखल झाले आहेत.