पणजीः बिगर सरकारी संस्थांच्या नावांने खंडणी उकळणाऱ्या संस्थांची चौकशी करून कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिला आहे. श्रेया धारगळकर हिच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला आहे.
दिल्लीहून परतल्यावर माद्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी स्वतः श्रीलईराई देवीचा भक्त आहे. तसेच कुंकळ्ळीकरण शांतादुर्गेचाही भक्त आहे. श्रेया धारगळकर यांनी केलेली वक्तव्ये ही भक्तांच्या श्रद्धा दुखावणारीच आहेत. लईराई देवीच्या धोंडांविषयी त्यांनी आक्षेपार्ह टीपण्णी केली आहे. त्यामुळे तिचा आणि अशी वक्तव्ये करणाऱ्यांचा मी निषेध करीत आहे. असे प्रकार करण्याचे धाडस पुन्हा कुणी करू नये यासाठी या प्रकरणात कडक कारवाई केली जाणार आहे. पोलीसांनाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात तिच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्रेया धारगळकर प्रकरणात करण्यात आलेली कारवाई पाहून इतरांनी असले दुःसाहस करू नये हीच अपेक्षा आहे. कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावत येणार नाही. तसेच स्वतःला बिगर सरकारी संस्था म्हणवून घेऊन खंडणी उकळण्याचे काम करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा लोकांविरुद्ध नागरिकांनी न घाबरता पोलिसात तक्रार करावी. तक्रारीची दखल घेतली जाणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.