पणजी : गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचलप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्लेकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. राज्यपालपदी नियुक्ती झालेले ते पहिले मूळ गोमंतकीय ठरले असून गोवेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. आर्लेकर यांनी सभापती तसेच मंत्री म्हणूनही काम केलेले आहे. सोमवारी सकाळी त्यांना प्रधानमंत्र्यांकडून फोन आला आणि नियुक्तीसंबंधी सांगितले. त्यानंतर आज सकाळी त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना काढण्यात आली.
आर्लेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी ‘मी मला भाग्यवान समजतो’, अशा शब्दात आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी मला फोन केला आणि राज्यपालपदी नियुक्ती केल्यास पद स्वीकारण्याची तयारी आहे का, असे विचारले त्यावर मी त्यांना ‘तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या. माझी तयारी आहे’ असे सांगितले. यासंबंधीची कुठेही वाच्यता करु नका, असे मला सांगितले. त्यामुळे काल मी कोणाशीही हा विषय बोललो नाही. आज (मंगळवारी) सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजींचा फोन आला आणि त्यांनी हिमाचलप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचे व यासंबंधीची अधिसूचनाही काढण्यात आल्याचे सांगून माझे अभिनंदन केले.’
कार्यकर्ता ते राज्यपाल
सामान्य कार्यकर्ता ते आमदार, सभापती, मंत्री आणि आता राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने तुमच्या काय भावना आहेत, असे विचारले असता आर्लेकर म्हणाले की, ‘भाजपमध्ये कार्यकर्त्याच्या कामाची नेहमीच कदर केली जाते. सत्तेवर असलेले किंवा धनाढ्य यांचाच विचार केला जातो, असे नव्हे. अगदी तळागाळात काम करणाऱ्याचीही कदर होते. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने एवढ्या मोठ्या उच्च पदावर नेऊन ठेवले याचा अभिमान आहे.’