लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याच्या बाजूने तिळारी कालव्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील काम अजून सुरू करायचे आहे. आमच्याकडे पुरेल इतके कच्चे पाणी आहे. त्यामुळे तिळारी कालवा बंद केल्याने टंचाई भासणार नाही, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
सुमारे ३० वर्षांच्या कालव्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम महाराष्ट्र सरकारने करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी जूनमध्ये झालेल्या तिळारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या सहाव्या बैठकीत महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली.
या कालव्यांचे काम सुरू आहे म्हणून गोव्यात पाण्याची कमतरता भासणार नसून गोव्यात पाण्याचा खूप साठा आहे. इतर सर्व धरणे भरलेली आहेत. या कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर लवकरच पाणी सोडले जाणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री शिरोडकर यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे कालवा दुरुस्तीचे काम काही दिवस पुढे ढकलले होते.
माती परीक्षण सुरु
राज्यात सध्या तीन नवीन धरणांवर शिक्कामोर्तब झाले असून, आणखी ४ लहान धरणांच्या जागा तपासणीची निविदा पुढील पंधरा दिवसांत काढली जाणार आहे. असेही शिरोडकर यांनी सांगितले. गोव्यातील धारबांदोडा तालुक्यात काजूमळ, तातोडी, माणके अशा तीन ठिकाणी ही धरणे बांधण्यात येणार आहे. या धरणांसाठी माती परीक्षणाचे काम हाती घेतले आहे. तसेच सत्तरी भागात चरावणे तसेच अन्य काही ठिकाणी मिळून आणखी चार धरणे येणार आहेत. या धरणांची जागा तपासणीसाठी निविदा काढली जाणार आहे, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.